मुंबई – कोविड पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास येत्या 22 ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात येत असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी 6 – 6 फुटांवर खुणा करून त्यानुसार लोक बसण्याची / उभे रहाण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील / उभे राहतील, याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणाऱ्या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी 6 फुट अंतरावर असावेत. कार्यक्रम / कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य
राहील.बालकलाकारांव्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्यावारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान हे बाळगण्यास मनाई राहील. नशा आणणाऱ्या पदार्थाचे / द्रव्यांचे सेवन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत, व आयोजकांनी तपासणी करुनच प्रवेश द्यावा.
गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह, इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार असल्यास कार्यक्रम पाहण्यासाठी उभे राहणे अथवा बसणे याकरिता मार्किंग करावे. ज्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणविषयक नियम पाळून ध्वनीक्षेपकावरुन सूचना द्याव्यात. अनियंत्रित गर्दी न रस्त्यावरील कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन परवानगी द्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ / पेये विक्रीस बंदी राहील. कार्यक्रम सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे नेपथ्य, प्रकाश व ध्वनी यंत्रणा, मंडप व मंडपाचे साहित्य, राजावट साहित्य यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ला अनुसरुन शक्य असेल तेथे कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत ध्वनीफित तसेच संबंधित फलक लावावेत.
याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन ) / सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून Break the Chain अंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे काटकोर पालन करणे बंधनकारक आहे. स्थानिक कोविड-19 साथरोग परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करुन उपरोक्त निर्बंधामध्ये वाढ करु शकतील.