नाशिक – सुवर्णकार समाजाला धमकी वजा खुले आव्हान देणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आव्हान आम्हीं स्वीकारले असून “तुम्हीं याच आणि लग्नात नाचून दाखवा” तुम्ही कसे नाचतात हेच बघतो अशा प्रकारचे प्रति आव्हान ओबीसी सुवर्णकार समितीचे जिल्हाप्रमुख गजू घोडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्याने लग्नाचे वातावरण चांगलेच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्री बच्चू कडू हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी दोन धर्मीयांमध्ये होणाऱ्या लग्नातील मुलीच्या घरी भेट देऊन विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी मी तुमच्या लग्नात येतो आणि नाचतो देखील कोण आडव येतो ते बघतो अशा प्रकारचे आव्हान दिले होते. यामुळे समस्त सुवर्णकर समाजाने त्याबाबत निषेध नोंदविला होता. यासंदर्भात शनिवारी सुवर्णकार समाजाची गुप्त बैठक देखील झाली. त्यामध्ये बच्चू कडू यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर ओबीसी सुवर्णकार समितीचे जिल्हाप्रमुख गजू घोडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारले असून यांनी लग्नाला यावे व नाचून दाखवावे, ते कसे नाचतात हेच आम्हीं बघतो अशा प्रकारचे प्रतिआव्हान दिले आहे. यामुळे मंत्री बच्चू कडू व सुवर्णकार समाज एकमेकांसमोर उभे ठाकले असून या आव्हान प्रतिआव्हानामुळे लग्नातील वातावरण चांगलेच चिघळणार एवढे मात्र नक्की. बच्चू कडू यांनी दिलेल्या आव्हाना संदर्भात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करणार असून त्यांचे मंत्रिपद काढावे यासाठी विनंती देखील करणार असल्याचे समितीचे जिल्हा प्रमुख गजू घोडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.