इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रक्त हा मानवी आयुष्यातील आणि शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, शरीरात रक्त नसेल तर मनुष्य निर्जीव समजला जातो. त्यामुळे रक्तदान आणि रक्त या शब्दाचा वारंवार उल्लेख आपल्याला आढळतो. केवळ मनुष्यच नव्हे तर पशु पक्षांमध्ये देखील रक्त हा घटक महत्त्वाचा असतो. रक्तामध्ये वेगवेगळे उपघटक असतात, तसेच रक्ताचे वेगवेगळे रक्तगट असून ओ रक्तगट हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण एका सर्वेक्षणात असेही आढळले आहे की ‘ओ’ रक्तगटाच्या लोकांना संक्रमणाचा धोका कमी असतो, तर ‘बी’ आणि ‘एबी’ रक्तगटातील रुग्णांना जास्त धोका असू शकतो.
साधारणतः A, B, AB, 0असे पॉझेटिव्ह आणि निगेटिव्ह असे अनेक रक्तगट माणसांमध्ये आढळतात, पण एक रक्तगट असा आहे, ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. हा रक्तगट फार कमी व्यक्तींच्या शरीरात आढळतो, यामुळे त्याला गोल्डन ब्लड म्हणतात. या रक्तगटाला Rh Null Blood Group असे म्हणतात. हे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दान करता येते. हे कोणत्याही रक्तगटाशी सहज जुळते. हा रक्तगट फक्त त्या व्यक्तीच्या शरीरात आढळतो ज्याचा आरएच फॅक्टर शून्य (Rh-null) असतो.
Rh Null रक्तगट, ज्याला सोनेरी रक्तगट म्हणतात, लाल रक्तपेशींवर (RBCs) Rh प्रतिजन (प्रथिने) नसतात. जर हे प्रथिन लाल रक्तपेशींमध्ये (RBC) असेल तर रक्ताला Rh+ पॉझिटिव्ह म्हणतात. परंतु या रक्तगटाच्या लोकांमध्ये आरएच फॅक्टर शून्य असतो. जगभरात हा एक अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे, कारण तो जगात केवळ ४३ व्यक्तींमध्ये आढळतो. हा रक्तगट असलेल्यामध्ये अमेरिका, ब्राझील, कोलंबिया आणि जपानमधील नागरिकांचा समावेश आहे. जगात या रक्तगटाचे फक्त नऊ जण रक्तदान करतात. म्हणूनच या रक्तगटाला गोल्डन ब्लड म्हणतात, कारण हा जगातील सर्वात महागडा रक्तगट आहे.
यातील हे रक्त कोणालाही देऊ शकते, पण या रक्तगटाच्या नागरिकांना रक्ताची गरज भासते, तेव्हा अनेक समस्या येतात. कारण हा रक्तगट जगात फक्त ४३ लोकांमध्ये आढळतो, त्यामुळे या ग्रुपचा दाता शोधणे कठीण आहे. या रक्तगटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक करणेही अवघड आहे.