ऑनलाईन पेमेंट करताय? ही खबरदारी घ्या..
पाच वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त नोटबंदी प्रकरणानंतर ‘ऑनलाइन पेमेंट’मध्ये वाढ झाली असली तरी गेल्या दोन वर्षाच्या कोविड काळामध्ये त्याला खऱ्या अर्थाने चालना मिळाली असे म्हणावे लागेल. कारण कोविड काळामध्ये बँकांही काही काळ बंद असल्यामुळे किंवा त्या चालू झाल्यावरही लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने सगळे व्यवहार ऑनलाईन करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे काही काळापूर्वी माहीत नसलेलया गुगल पे, पेटीएम, फोन पे यासारखी ॲप्स प्रत्येकाच्या फोनवर दिसायला लागली. ऑनलाइन पेमेंटचे फायदे बरेच असले तरी असे पेमेंट करताना काय खबरदारी घ्यावी हे बऱ्याच लोकांना माहीत नसल्याने ‘फ्रॉड’ करणाऱ्या लोकांचे फावते आणि अनेकांना कष्टाने मिळवलेल्या पैशावर पाणी सोडावे लागते.
कोणत्याही सेवेसाठी पैसे देणे हा व्यवहार सुरक्षित राहिला पाहिजे. ते ॲप सुरक्षित असेल अशी त्यांच्या निर्मात्यांची जशी जबाबदारी आहे, तसेच ते वापरताना आपण सुरक्षितपणे वापरू याची खबरदारी प्रत्येक ग्राहकाने घ्यायला हवी. त्यासाठी किमान काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
१. फोनवरून ही ऍप्स वापरताना तुमच्या फोनला स्क्रीन लॉक हवा. जे लोक ॲपलचा आयफोन वापरतात त्यांना या स्क्रीन लॉकची सवय असते, परंतु, अँड्रॉईड फोन वापरणार्याना असा स्क्रीन लॉक वापरणे रोजच्या सवयीचे नसते. त्यांना ती सवय करून घ्यावी लागेल. म्हणजे तुमचा फोन दुसऱ्या कोणी हाताळला तरी ते स्क्रीन अनलॉक करण्यासाठी चार आकडी पिन माहीत नसल्यामुळे ती व्यक्ती तुमचा फोन उडू शकणार नाही आणि तुमचे पेमेंट ॲप सुरक्षित राहील. तुमचा स्क्रीन लॉकचा पिन कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही शेअर करू नका.
२. तुमच्या पेमेंट ॲपसाठी अत्यंत कठीण असा पासवर्ड वापरा. त्या पासवर्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर, जन्मतारीख, लग्नाची तारीख अथवा कुटुंबातले कोणाचेही वाढदिवस, नाव असे अजिबात येऊ देऊ नका. अक्षरे, आकडे आणि कॅरेक्टर यांचे मिश्रण करून हा भक्कम पासवर्ड बनवा. म्हणजे यदाकदाचित तुमच्या स्क्रीन लॉकचा पासवर्ड कुणाला कळला तरी पेमेंट ॲप ओपन करणे सहज शक्य होणार नाही. पेमेंट अँपवर कायम लॉगिन करू नका. आवश्यक असेल तेव्हाच लॉगिन करा. आता व्हाट्सअँपनेही पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इथे तर अधिक सावधानता बाळगली गेली पाहिजे.,
२. आजकाल अनेक लिंक वेगवेगळ्या माध्यमात पाठवल्या जातात. त्या व्हाट्सअपवरून आल्याअसतील अथवा एसएमएसच्या स्वरूपात असतील. तुम्हाला माहीत नसलेल्या एकाही लिंकवर कधीही क्लिक करायचे नाही. ही खबरदारी तुम्हाला घ्यावीच लागेल. साधारणपणे अशा लिंकमध्ये भरपूर मोठ्या पैशाचे अथवा वस्तूचे आमिष दाखवलेले असते आणि माणूस त्याला भुलतो आणि आपला पिन अथवा ओटीपी दुसऱ्याशी शेअर करतो. असे झाले तर तुमच्या बँक खात्यातील पैसे नाहीसे होण्यास वेळ लागणार नाही. तुम्हाला कोणत्याही संशयास्पद व्यक्तीचा फोन आला आणि तो वेगळी आमिषे दाखवायला लागला तर कोणत्याही परिस्थितीत भुलून जाऊ नका.
३. अनेक जण गुगल पे, पेटीएम, फोन पे अशी सगळी अँप्स एकाच वेळेला वापरतात. असे करणे टाळा. शक्यतो एकच ॲप वापरा. म्हणजे हिशोब ठेवणेही तुम्हाला सोपे जाईल. अनेकदा लोक या अँप्लिकेशन्सना बँक अकाउंट लिंक करतात. म्हणजे प्रत्येक व्यवहाराच्या वेळेस बँक खात्यातून पैसे वजा होतात. बँक खाते लिंक करणे हे धोकादायक आहे असे वाटले तर त्या ॲपच्या वॉलेटमध्ये तुम्ही काही पैसे ट्रान्सफर करून ठेवू शकता. म्हणजेच यदाकदाचित तुमचे ॲप हॅक झालेच किंवा दुसऱ्याच्या हाती फोन लागलाच तर केवळ वॉलेटमधील पैसे जातील, बँक खात्यातील पैसे जाणार नाहीत आणि तुमचे बँक खाते सुरक्षित राहील.
४. ॲप वरून पेमेंट करताना शेवटी तुमचा यु पी आय पिन द्यावा लागतो. तो कोणालाही सांगू नका. तो फक्त तुम्हालाच माहीत हवा. तो पिन दिल्याशिवाय पेमेंट प्रक्रिया पूर्ण होणार नाही . म्हणजे सुरुवातीला स्क्रीन लॉक, नंतर ॲप्स पासवर्ड आणि शेवटी यु पी आय पिन अशा भक्कम भिंती पेमेंट अँपमध्ये आहेत. हे तिन्ही सुरक्षित राहिले तर तुमचे पेमेंट पूर्णपणे सुरक्षित राहील याची खात्री बाळगा. या वरवर अत्यंत साध्या वाटणाऱ्या सूचना पाळल्या तरी तुमचे ऑनलाइन पेमेंट सुरक्षित राहील.
५. पर्सनल कंप्यूटरवरून पेमेंट करत असाल तर आपण आपल्या बँकेची योग्य ती वेबसाइट उघडली आहे ना हे तपासून बघा. अनेक वेळेला फिशिंग म्हणजे सारख्या दिसणाऱ्या वेबसाईट काढून लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे बँकेची वेबसाइट योग्य आहे याची खात्री करून घ्या. आता बँकेच्या वेब ॲड्रेसच्या सुरुवातीला एचटीटीपीएस असे लिहिलेले असते. बँकेच्या वेब ॲड्रेस मधील नाव बरोबर आहे ना हे तपासून बघा आणि मगच लॉगिन करा.
ऑनलाईन पेमेंट सोयीचे आणि सोपे वाटत असले तरी तुम्हाला त्याचा वापर करताना किमान खबरदारी तरी बाळगावीच लागेल.
(ज्येष्ठ पत्रकार श्री अशोक पानवलकर यांच्या ब्लॉगवरुन साभार)