मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन आयकर किंवा प्राप्तीकर भरताना तुम्हाला शुल्कासह जीएसटी जमा करावा लागणार आहे. यापुर्वी प्राप्तीकर भरताना आतापर्यंत करदात्याला कुठलेही शुल्क द्यावे लागत नव्हते. परंतु, वेळेत कर न जमा केल्यास त्याला विलंब शुल्क आकारण्यात येत होता. आयकर भरण्यास जास्त उशीर झाल्यास दंडाची आणि कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.
प्राप्तीकर भरण्यासाठीही शुल्क व जीएसटी आकारण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 30,000 रुपयांचा आयकर भरला तर ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. प्राप्तीकर खात्याच्या ई-फायलिंग या संकेतस्थळावरुन ‘पेमेंट गेटवे’ वापरल्यास तुम्हाला शुल्कासह जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यामुळे करदात्यांचा हिरमोड होणार हे नक्की आहे. विशेष म्हणजे या पेमेंट गेटवेमध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि युपीआयचा समावेश आहे. कर भरताना व्यवहार शुल्क समोर येईल. त्याठिकाणी कोणत्या बँकेकडून, कोणत्या पद्धतीने तुम्ही आयकर भरत आहे, त्याविषयीच्या व्यवहार शुल्काचा तपशील देण्यात येईल. तुम्ही नेट बँकिंगद्वारे एचडीएफसी बँकेकडून आयकर जमा करत असाल तर तुम्हाला १२ रुपये व्यवहार शुल्क द्यावे लागेल.
तसेच आयसीआयसीआय बँकेसाठी ९ रुपये, स्टेट बँक आणि अॅक्सिस बँकेसाठी प्रत्येकी ७ रुपये, फेडरल बँक सोडून इतर सर्व बँकांसाठी ५ रुपये व्यवहार शुल्क द्यावे लागेल. या शुल्कासह १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल. क्रेडिट कार्डद्वारे प्राप्तीकर भरल्यास ०.८५ टक्के शुल्क आणि १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. परंतु, डेबिट कार्ड आणि युपीआय द्वारे आयकर भरण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क भरावे लागणार नाही. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला ३० हजार रुपये प्राप्ती कर भरायचा आहे. तुम्ही हा कर क्रेडिट कार्ड पेमेंट मोडद्वारे भरत असाल तर , तुम्हाला ०.८५ टक्के कन्व्हेयन्स चार्ज द्यावा लागेल. म्हणजे २५५ रुपये शुल्क द्यावे लागेल. त्यावर १८ टक्के जीएसटी म्हणजे ४५.९ रुपये द्यावे लागतील.
क्रेडिट कार्डद्वारे प्राप्तीकर भरला तर तुम्हाला ३० हजार रुपयांवर तुम्हाला २५५ रुपये आणि ४५.९ असे एकूण ३००.९ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. जेवढा आयकर जास्त तेवढे हे शुल्क जास्त द्यावे लागणार आहे. आता तुम्ही नेट बँकिंगद्वारे प्राप्ती कर भरल्यास बँका जशा शुल्क आकारतात, त्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल. आता तुम्हाला आयकर भरताना शुल्क आणि जीएसटी चुकवायचा असेल तर एक मार्ग आहे. प्राप्तीकर भरताना तुम्ही तो डेबिट कार्ड अथवा युपीआय या पर्यायाद्वारे भरल्यास तुम्हाला व्यवहार शुल्क अथवा जीएसटी द्यावा लागणार नाही. या दोन्ही पेमेंट गेटवेवरून कर भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
Online Payment Income Tax GST
New Rules