मुंबई – धर्मांतराच्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे रोजच्या तपासातून होत आहेत. आता तर या प्रकरणातील मुख्य आरोपी शहनवाज खान हा थेट पाकिस्तानातील ३० लोकांच्या संपर्कात होता, असा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. ‘केरळ स्टोरी’पेक्षा भयंकर काहीतरी या प्रकरणातून पुढे येणार असल्याची शंका पोलिसांना येत आहे.
गाझियाबाद येथील कवी नगर मध्ये राहणाऱ्या एका तरुणाला इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजबरी केली जात आहे, अशी तक्रार ३० मे रोजी दाखल करण्यात आली होती. त्यावरून धर्मांतराचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आणि त्याचे धागेदोरे ठाण्यातील मुंब्रापर्यंत येऊन पोहोचले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला तर तो अलीबागमध्ये सापडला. अलीबागमध्ये शहनवाज एका हॉटेलमध्ये आपल्या भावासोबत राहात होता. १० जूनला त्याला पोलिसांनी अटक केली.
गाझियाबाद पोलिसांनी त्याला न्यायालयात सादर केले आणि आता १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. यादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेला मोबाईल आणि लॅपटॉप तपासला जात आहे. मोबाईलमध्ये ३० पाकिस्तानी लोकांचे मोबाईल क्रमांक आढळले आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहनवाज आणि पाकिस्तानातील या लोकांमध्ये कितीवेळा संपर्क झाला, त्यांच्या इतरत्र कुठे भेटी झाल्या का, त्यांच्यात काही देवाणघेवाण झाली का, याचा तपास पोलीस लावत आहेत. शहनवाज खान याचीही आता कसून चौकशी होईल. त्यातूनही बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणार आहे.
तर मोठी कारवाई
शहनवाजच्या मोबाईलमध्ये ज्या ३० लोकांचे क्रमांक आढळले आहेत, त्यांच्यासोबत काही आक्षेपार्ह व्यवहार झाले असतील किंवा देवाणघेवाण झाली असेल तर त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होईल, हे निश्चित आहे.
सहा ई-मेल्स!
शहनवाजच्या लॅपटॉपमध्ये शिरल्यानंतर तो ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतराचे रॅटेक चालवत होता, हे स्पष्ट झाले. त्यासाठी तो एक-दोन नव्हे तर तब्बल सहा इ-मेल आयडीज वापरत होता, अशीही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.