मुंबई – चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी नवनवे निर्देश देऊन जगाचे लक्ष वेधण्याचे कामही चीनमधील सरकार करीत असते. आता त्यांनी आठवड्यातून फक्त तीनच तास ऑनलाईन गेम खेळता येईल असा फतवा काढला आहे. खेळाऐवजी शिक्षणात आणि कामात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. बुधवारपासून हे सर्व नियम लागू होणार असून आता १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आठवड्यातून फक्त तीनच तास आनलाईन गेम खेळू शकणार आहेत. देशातील तरुणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे, यावर जोर दिला जात आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. शी जिनपिंग सरकार आनलाईन गेमिंगकडे वेगळ्या नजरेतून बघत आहे. ऑनलाईन गेमिंग हा राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी धोका समजला जात आहे. ऑनलाईन राहून किशोरवयीन मुले केवळ सेलिब्रिटींवर आपला अकारण वेळ घालवत आहेत आणि ते सामाजिक अभिव्यक्तीच्या विरोधात संघटीत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड होईल, असे सरकारला वाटते.
अर्थव्यवस्थेचे नुकसान
नव्या नियमांमुळे ऑनलाईन गेमची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे नुकसान होऊ शकते. व्यापारी आणि अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात आणि बेरोजगारी आणखी वाढू शकते. पण सरकारने मात्र तरुणांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.
सेलिब्रिटी नकोच
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म व्हिबो कॉर्पने फॅन्स क्लब आणि मनोरंजन बातम्यांचे हजारो अकाऊंट डिलीट केले. अशा प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटींची यादी जारी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत ऑनलाईन गेम खेळण्यास मनाई करण्यात आली होती.