स्विगी
आपल्या आवडत्या रेस्टॉरंट मधून फोनवर जेवण घरी मागवणं भारताला काही नवीन नव्हतं. पण ऑर्डर दिल्यानंतर नेमकं किती वेळात ते घरी येईल? याची शाश्वती कधीच नव्हती. त्यातही घरी आणून दिल्याबद्दल डिस्काउंट किंवा ऑफर्स तर सोडाच पण कदाचित रेट देखील जास्त द्यावे लागत होते. पण आजच्या ऑनलाईन च्या जमान्यात जेवण देखील ऑनलाईन ऑर्डर करू शकता व ते देखील ऑफर्स व सूट यासह. स्विगी हे भारतीय स्टार्टअप त्यातीलच एक आहे. आज जाणून घेऊया त्यांच्याविषयी…
श्रीहर्ष मजेटी, नंदन रेड्डी व राहुल जयमनी या तिघांनी ऑगस्ट २०१४ मध्ये स्विगी या स्टार्टअपची मुहूर्तमेढ रोवली. स्विगी हे देशातील निवडक स्टार्टर्स पैकी एक आहे ज्यांचा २०१८ सालचे मूल्यांकन एक बिलियन डॉलर्सहून अधिक करण्यात आले. याच बिलियन डॉलर क्लबला युनिकॉर्न क्लब असे देखील म्हटले जाते. विशेष म्हणजे या युनिकॉन क्लबमधील सर्वात उशिरा सुरू झालेल्या आणि सगळ्यात कमी वेळेत या क्लबमध्ये समाविष्ट झालेली स्विगी ही एकमेव कंपनी आहे.
श्रीहर्ष मजेटी व नंदन रेड्डी दोघेही बिट्स पिलानी येथून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीला लागले. श्री हर्ष याने काही काळ नोकरी करून मग एमबीए करण्याचे ठरवले आणि एका चांगल्या विद्यापीठातून वित्त व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो लंडन येथील एका प्रतिष्ठीत कंपनीत लागला. नोकरी करत असताना तो एका मोठ्या सुट्टीवर गेला असता त्याला स्वातंत्र्याचे महत्व व नोकरीतील बंदिस्तपणा याची जाणिव झाली. घरची देखील व्यवसायाची पार्श्वभूमी असल्याने त्याला आता व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली. लवकरच त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन तो भारतात परतला.
धंद्यात जोडबळ हवं म्हणून त्याने आपला कॉलेज मित्र नंदन रेड्डी याला संपर्क केला आणि सोबत व्यवसाय करण्यासाठी विचारणा केली. दोघांनीही मग वेगवेगळे व्यवसाय संधी शोधण्यास सुरुवात केली. २०१३ मधील वाढत असलेल्या इ-कॉमर्स व्यवसायाचा फायदा घ्यायचा, असं त्यांनी ठरवले. आणि या इ-कॉमर्स कंपन्यांना जसे ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी विकलेल्या वस्तू पुरवण्यासाठी लागणाऱ्या कुरिअर सर्विसेसच्या व्यवसायाला एका छताखाली आणायचे त्यांनी ठरवले. म्हणजे सर्व कुरिअर वाल्यांना जोडून एकसंधता निर्माण करायची. यात त्यांनी आपले पूर्ण लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मधले ज्ञान लावले. बंडल टेक्नॉलॉजी नावाने ही कंपनी स्थापन केली.
व्यवसाय जरी उत्तम असला तरी त्याची अंमलबजावणी जोपर्यंत यशस्वीपणे होत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाला काही किंमत नाही. आणि यांचेही असेच झाले. कन्सेप्ट उत्तम पण त्याची योग्य ऑनलाईन व्यवस्था मांडता न आल्यामुळे त्यांना हा व्यवसाय लवकरच बंद करावा लागला.
या व्यवसायात आलेल्या अपयशामुळे खचून न जाता त्यांनी अपयशाची कारणमीमांसा केली व त्यांच्या असे लक्षात आले की केवळ तांत्रिक बाजू कमजोर असल्याने त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला. आता पुन्हा त्यांचा नव्या व्यवसायाचा शोध सुरू झाला. त्यांच्या विचारसरणीचा कल लॉजिस्टिक्स म्हणजे वाहतूक याकडेच होता. त्यातून त्यांना फूड लॉजिस्टिक्सचा व्यवसाय भावला. पण हे करत असताना आता पुन्हा अधीच्या चुका होऊ नयेत यासाठी त्यांनी एका तंत्रज्ञानाच्या एक्स्पर्टला सोबत घ्यायचे ठरले. राहूल जैमनी हा तेव्हा मिंत्रा या इ-कॉमर्स कंपनीसाठी काम पहात होता. राहुल या नव्या स्टार्टअपची संकल्पना सांगितल्यावर तोही यांच्यासोबत काम करण्यास तयार झाला.
बंडल टेक्नॉलॉजी हेच नाव घेऊन त्यात स्विगी नावाच्या ब्रँडची स्थापना ऑगस्ट २०१४ मध्ये करण्यात आली. या कंपनीचे मॉडेल हे अर्धे ऑनलाईन व अर्धे ऑफलाईन आशा स्वरूपाचे आहे. यासाठी त्यांनी सुरुवातीला केवळ बंगळुरू शहरातील २५ रेस्टॉरंट सोबत करार केला. सुरुवातीला ६ डिलिव्हरी बॉईजची नेमणूक केली. यात ग्राहकाने अँप वरून आपल्या पसंतीच्या हॉटेल मधून हवी ती डिश ऑर्डर करायची. ऑर्डर करता क्षणी ती हॉटेलच्या कॉम्प्युटरवर दिसेल. ते ती ऑर्डर पॅक करून स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजला देतील. त्यानंतर ही ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवतील. हे सर्व करताना डिलिव्हरी देण्यासाठी वेळेचे बंधन असेल आणि सोबतच क्वॉलिटीचे देखील मापदंड ठरलेले असतात. ग्राहकाला या सुविधेमध्ये ऑनलाइन पेमेंट सोबतच कॅश ऑन डिलिव्हरी देखील सुविधा देण्यात येते.
ज्या काळात स्विगीची सुरुवात झाली त्यावेळेला मार्केटमध्ये झोमॅटो सोबतच अनेक जुने प्लेअर्स उपस्थित होते. अनेकांच्या मते स्विगी या क्षेत्रातील उशिरा येणारे स्टार्टअप अशी ओळख निर्माण झाली होती. त्यात आता मार्केटमध्ये या व्यवसायाला स्कोप उरला नाही, असे अनेकांचे मत होते. ओला कॅबने देखील या क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनाही अपयशच पदरी पडले. त्यामुळे त्यांना फूड डिलिव्हरी लवकरच बंद करावी लागली.
स्विगीच्या तुलनेत झोमॅटोकडे किंवा इतर स्पर्धकांकडे अमाप पैसा होता. पण या सर्वांकडे जी गोष्ट नव्हती त्याचा स्विगीने अभ्यास केला. आणि ती गोष्ट अंमलात आणली होती. ती होती, या सर्व कंपन्यांनी आपले लॉजिस्टिक्स म्हणजे डिलिव्हरी मेकॅनिझम आऊटसोर्स केलेले होते. या सर्व कंपन्यांच्या स्वतःच्या वेबसाइट, ॲप्स होते पण स्वतःचे डिलिव्हरी बॉईज किंवा गाड्या नव्हत्या. त्यासाठी या कंपन्यांनी तिसऱ्या पार्टीला कॉन्ट्रॅक्ट दिले होते. यामुळे त्या कंपन्यांची गुंतवणूक कमी झाली असेल किंवा गाड्यांचे नियोजन व डिलिव्हरीचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता नव्हती. पण या सगळ्याचा परिणाम त्यांच्या सर्व्हिस क्वॉलिटीवर दिसून येत होता. इतर कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईजचं वागणं, त्यांची ग्राहकासोबत बोलण्याची पद्धत, वेळेत ऑर्डर पुरवण्याची तळमळ या गोष्टी कुठेतरी कमी पडत होत्या. आणि याच गोष्टींचा फायदा स्विगीने घ्यायचं ठरवलं.
अगदी सुरुवातीपासूनच स्विगीचा पूर्ण भर हा ग्राहकाच्या संतुष्टीकडेच होता. नफा कमी झाला तरी चालेल पण ग्राहकाला योग्य ती सर्व्हिस पुरवणे हेच आपले आद्यकर्तव्य आहे याच तत्वावर स्विगी काम करत आहे. ऑर्डर केलेले अन्न त्याच्या क्वॉलिटीवर आपले नियंत्रण नसले तरी ती ऑर्डर डिलिवर करण्याच्या पद्धतीवर, या सेवेच्या इतर आयामांवर आपले नियंत्रण आहे आणि तीच गोष्ट सर्वोत्कृष्ट करायची, हीच शिकवण सतत स्विगीकडून आपल्या डिलिव्हरी बॉईजला दिली जाते.
स्विगीला पहिली फंडिंग मिळाली ती एप्रिल २०१५ मध्ये. जेव्हा संपूर्ण स्टार्टअप विश्व हे फंडिंग मिळवण्यासाठी झटत होतं. पण इन्व्हेस्टर गुंतवणूक करायला तयार नव्हते. अशा काळात स्विगीला बारा कोटी रुपयांची फंडिंग मिळाली होती. ही फंडिंग मिळवली त्यावेळेला स्विगी कडे स्वतःचे दीडशे डिलिव्हरी बॉईज कार्यरत होते. ही फंडिंग मिळाल्यानंतर स्विगीने आता नवीन ११ शहरांमध्ये आपला व्यवसाय वाढवला. या पाठोपाठच जून २०१५ मध्ये ३५ कोटी व जानेवारी २०१६ मध्ये ७०० कोटी रुपयांची फंडिंग मिळवून स्विगीने भारतभरात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास ही स्विगीच्या कार्याला असलेली खरीखुरी पावतीच होती.
जानेवारी २०१७ मध्ये क्लाऊड किचन नावाची नवीन संकल्पना स्विगीने आणली. ज्या भागामध्ये चांगले रेस्टॉरंट नाहीत त्या भागात स्विगी ने स्वतः ऑर्डर्स तयार करून पुरवण्यास सुरुवात केली. वाढत्या व्यवसायासोबत जुलै २०१७ मध्ये दर महिन्याला ५० लाखांहून अधिक ऑर्डर्स पुरविण्याचा महत्त्वाचा टप्पा स्विगीने गाठला. जून २०१८ मध्ये एक कोटी ४० लाख ऑर्डर्स टप्पा गाठल्यानंतर स्विगीला आजपर्यंतची सर्वात मोठी आणि बहुप्रतिष्ठित युनिकॉर्न क्लब मध्ये नेऊन बसवणारी नऊ अब्ज रुपयांहून अधिकची फंडिंग प्राप्त झाली. इतकी फंडिंग मिळाल्यानंतर स्विगीला आता पीछेहाट नाहीच.
अनेक लहान मोठे अडथळे येत गेले. पण तिघांनी वेळोवेळी मार्ग काढला. ग्राहकाला सर्वोत्तम सर्व्हिस देण्यासाठी ते झपाटून काम करीत आहेत. स्विगी आज भारतातील पहिल्या क्रमांकाची डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडर बनली आहे. स्विगीपूर्वी याच बिझनेस मध्ये असलेले झोमॅटो, फूडपांडा इत्यादी व स्विगी नंतरही आलेले आंतरराष्ट्रीय ब्रँड उबर इट्स सारखे सर्वच स्विगी पासून मोठ्या अंतरावर आहेत. याच जोरावर आज स्विगी भारतातील वीस हजाराहून अधिक रेस्टॉरंट सोबत जोडली गेली आहे. आपल्या लाखो ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे अन्न अगदी कमीत कमी वेळेमध्ये पुरवत आहे तेही घरबसल्या.
online food delivery startup swiggy success story dr Prasad Joshi industry