पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाइन शॉपिंग असो की कुठल्याही स्वरूपातील बिलाचा भरणा असो… आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन वीजबिल भरणा करताना ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नावे आदी गोष्टींची पडताळणी करूनच पेमेंट प्रोसेस करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ऑनलाइल वीजबिल भरणा करण्यासाठी विविध पेमेंट अॅप उपलब्ध आहेत. गुगल पे, पेटीएम, फोन पे, भारत पे आदींच्या माध्यमातून घरबसल्या वा कुठूनही बिल भरणे सहजशक्य झाले आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीदेखील ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारत आहे. अशात आता उन्हाळा वाढला आहे. भरउन्हात रांगेत उभे राहून बिलाचा भरणा करण्याऐवजी आरामात घरबसल्या बिल भरणे सोयीस्कर आहे. तेव्हा अनेक जण ऑनलाइन पेमेंटचा मार्ग स्वीकारताहेत. मात्र, हा पर्याय स्वीकारत असताना थोडी जरी चूक झाली तर हजारोंचे आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना घडताहेत.
अशा चुकांमध्ये ग्राहक क्रमांक टाकताना होणारी चूक सर्वाधिक लोक करतात. तेव्हा अशा प्रकारचे पेमेंट करताना ग्राहक क्रमांक बरोबर टाकायला हवा. ग्राहक क्रमांकाप्रमाणेच ग्राहकाचे नावदेखील बरेचदा चुकत असल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते, असे सायबरतज्ज्ञ सांगतात. यूपीआय पेमेंट सेवा ही खूप जलद मानली जाते. मात्र, यावरून पेमेंट करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, यात एकदा पेमेंट केल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळेच यूपीआय पेमेंट करताना सर्वप्रथम सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासणे जरुरीचे आहे.
Online Electricity Bill Payment Precaution Fraud