नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचे भाव कोसळल्याने त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली आहे. नाफेड मार्फत योग्य त्या किंमतीत कांदा खरेदी सुरू करावी याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मागणी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेड मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी यासाठी डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.
राज्य सरकार मार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ नाफेड मार्फत योग्य त्या किंमतीत कांदा खरेदी सुरू करावी अशा आशयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील निवेदद्वारे कळविण्यात आले आहे. कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जवळजवळ संपूर्ण देशात प्रामुख्याने लहान आणि अल्पभूधारक शेतकरी कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. कांदा हे कष्टकरी पीक आहे. देशभरातील 30.03 टक्के वाटा असलेले कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
महाराष्ट्रात यावेळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे याचा परिणाम भावावर होत असून दर घसरले आहेत परिणामी शेतकर्यांना कांदा विक्री करताना त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका शेतकर्यांना बसत असून कांदा पीक कमी किमतीत विक्री करावे लागत असल्याने, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन नाफेड मार्फत तात्काळ कांदा खरेदी करण्याबाबत मागणी केली होती. याची दखल घेत डॉ. पवार यांनी सदरची बाब केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली.
ग्राहक व्यवहार विभाग, (DOCA), ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते. कांद्याची खरेदी FPCs/FPOs मार्फत शेतकरी/शेतकरी गट/शेतकरी उत्पादक संस्थांकडून फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव APMC येथे प्रचलित बाजार दरांनुसार खुल्या लिलावाद्वारे केली जाते. महाराष्ट्र राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत सन २०२२ मध्ये रु. ३५१ कोटी रक्कमेचा २ लाख ३८ हजार १९६ मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी रु.१४७५ प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता.
यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेड मार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी डॉ. पवार यांनी मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली यावर तात्काळ नफेड मार्फत सदरची किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांदा खरडे करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मंत्री गोयल यांनी दिले. नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले असून शेतक-यांनी डॉ.भारती पवार पवार यांचे आभार व्यक्त केले आहे.
Onion Rates Collapse Minister Bharti Pawar Letter to Piyush Goyal