मुंबई/नवी दिल्ली – कांदा उत्पादकांसाठी कडू तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी गोड बातमी आहे. कांद्याचे दर आणखी गडगडणार आहेत. दोन प्रमुख कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण होणार आहे. दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळाले या आशेवर कांदा उत्पादक होते तर कांद्याच्या दराने पन्नाशी गाठल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता होती. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे.
सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडाला असताना सर्वसामान्य ग्राहकांना मात्र आता काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण कांदा स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याकरिता केंद्र सरकार बफर स्टॉकमधला सुमारे १ लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात आणणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कांद्याचे दर सुमारे ६० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा सुमारे ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्याने कांदा स्वस्त होणार आहे.
गेल्या आठवड्यात बफर स्टाॅक केलेला कांदा विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच मुंबईतील चार बड्या निर्यातदारांनी थेट इराणचा सुमारे ६० कंटेनर कांदा मुंबईत मागवला. त्यापैकी सुमारे २५ कंटेनर कांदा जेएनपीटी बंदरातुन नवी मुंबई एपीएमसी मार्केट यार्डात दाखल झाला. तर ३५ कंटेनर कांदा अजून जेएनपीटी बंदरात पडलेला आहे.
केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले की, आतापर्यंत देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बफर स्टॉकमधून १ लाख टन ११ हजार टन कांदा बाजारात आणला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात सुमारे १० रुपये किलोने भाव कमी झाले आहेत. हा बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली, भोपाळ, सुरत, अहमदाबाद, पुणे, नागपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला.
केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमार्फत कांद्याच्या किमती स्थिर करण्यात येत आहेत. कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे आता परिणाम समोर आले आहेत. कांद्याच्या किमती आता गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वस्त आहेत. कारण कांद्याच्या किरकोळ विक्रीत किंमत सुमारे ४० रुपये प्रति किलो आहे, तर घाऊक बाजारात सुमारे ३१ रुपये प्रतिकिलो आहे.
केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत किरकोळ किमती सुमारे १० रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात कांद्याने उचल खात दरामध्ये पन्नाशी गाठली होती, यामुळे कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने धाडी घातल्या होत्या. त्यानंतर आता मुंबईतील चार निर्यातदारांनी थेट अनेक कंटेनरमधूनच इराणचा कांदा मुंबईत मागवला. सदर कांदा नवी मुंबईच्या वाशी मार्केट यार्डात दाखल झाला असून या कांद्याची प्रतवारी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे उद्या सोमवारी हा कांदा घाऊक बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे. हा कांदा फार काळ टिकाऊ नाही. त्यामुळे हाॅटेल व्यावसायिक त्याची खरेदी करतात. इराणचा कांदा मुंबईत आल्यामुळे त्याचा राज्यातील कांद्याच्या दरावर कुठला ही परिणाम होणार नसल्याची माहिती घाऊक कांदा व्यापारी यांनी दिली.