मुंबई – कांदा उत्पादकांसाठी निराशाजनक तर कांद्याच्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलोला ४५ रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. त्यातच येत्या तीन महिन्यात देशातील ५ राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. इंधन, सिलेंडर पाठोपाठ महागाई वाढत आहे. त्यातच कांद्यानेही उसळी मारल्याने त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळेच सरकारने आता बफर स्टॉकमध्ये असलेला कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला आहे. हा कांदा सध्या बफर स्टॉकमध्ये आहे. यंदा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह कर्नाटक व अन्य राज्यात कांद्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्येही कांद्याचे दर वाढले आहेत. दिल्लीसह विविध देशभरातील किरकोळ बाजारांमध्ये कांद्याचे दर ४५ रुपये किलो पेक्षा अधिक आहे. त्यातच येत्या काही दिवसात हे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळेच बफर स्टॉकमधील १ लाख टन कांदा बाजारात आणण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. हा कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे किरकोळ बाजारातील दर ३२ ते ३५ रुपये किलो एवढे होणार आहेत. मात्र, या निर्णयाचा कांदा उत्पादकांना बसणार असून बाजार समितीमधील कांद्याचे दर घटणार आहेत.