नवी दिल्ली – सध्याच्या सणासुदीच्या काळात इंधन, खाद्यतेल आणि भाज्यांच्या महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवाळीनंतर आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. कारण येत्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांद्याचे दर वाढू शकतात, असा कृषी तज्झांचा आणि शेतमाल व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
दिवाळीपर्यंत कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, दिवाळीनंतर त्याच्या किमती वाढू शकतात. या संदर्भात एका पाहणी अहवालात व्यापाऱ्यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, अवकाळी पाऊस आणि ओलावा यामुळे डिसेंबरपर्यंत कांद्याच्या किमतींवर मोठा परिणाम होईल. व्यापाऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसात हवामान बिघडत राहिले तर कांद्याचे दर आणखी वाढू शकतात. दुसरीकडे, हवामान अनुकूल राहिल्यास, दिवाळीपर्यंत किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहू शकतात.
सध्या दिल्ली, इंदूर, भोपाळ, सुरत, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक प्रमुख महानगरांमध्ये कांद्याचे दर सुमारे 50 ते 75 रुपये प्रति किलो आहेत. गेल्या एका महिन्यात कांद्याचे भाव वाढले आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेत कांद्याची सरासरी घाऊक किंमत दि. 16 सप्टेंबर रोजी 14.75 रुपये प्रति किलो होती, तर आता दि. 16 ऑक्टोबर रोजी 33.40 रुपये प्रति किलो झाली आहे. लासलगाव बाजारपेठही दिल्लीला कांद्याचा सर्वात मोठा पुरवठा करणारी बाजारपेठ आहे.
अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाची आकडेवारी दर्शवते की, गेल्या एक महिन्यात कांदा आणि टोमॅटोच्या किरकोळ किमती लक्षणीय वाढल्या आहेत. दिल्लीत कांद्याचे दर सप्टेंबरमध्ये 33 रुपये प्रति किलोवरून वाढून 47 रुपये किलो झाले आहेत. टोमॅटोच्या बाबतीतही भाव वाढले आहेत. दिल्लीतील बाजारपेठ आता 59 रुपये किलोने विकत आहे, जे एक महिन्यापूर्वी 28 रुपये किलो होते. इतर काही ठिकाणी कांद्याचे भाव 50 रुपये किलो पार केले आहेत, तर टोमॅटोचे भाव 60 रुपये किलोच्या जवळपास आहेत.
विशेष म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा निर्यातदार आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की, सरकार किंमतीतील वाढ थांबवण्यासाठी निर्यातीवर निर्बंध लादू शकते. असे झाल्यास बांगलादेश, नेपाळ, मलेशिया आणि श्रीलंकेत कांद्याचे दर वाढू शकतात. त्याचबरोबर सरकार बफर स्टॉकमधून कांद्याची मुक्तता लवकर करेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळू शकतो, परंतु कांद्याचे भाव वाढल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, तर व्यापार्यांनाच होतो हे वास्तव आहे.