नशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली असून कांद्याचे भाव कोसळतच आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढतात. यंदा मात्र पावसाळा जवळ येऊन ठेपला तरी भावात वाढ होण्याऐवजी घसरण सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अवघा ५० पैसे किलो दर मिळाला आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्याच्या कांद्याला हा भाव मिळाला आहे. लासलगाव बाजारपेठेत चांगल्या प्रतीचा कांदा चारशे रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
कांदा हे पीक लहरी असून त्यामध्ये खूप कमी वेळा फायदा होतो. परंतु नेहमी तोटा होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुय्यम कांद्याला तर उठाव नसून तो जागेवरच सडत आहे. येवला तालुक्यातील देशमाने येथील शेतकऱ्याने गुलाटी कांदा लासलगाव बाजारपेठेत विक्रीसाठी आणला. त्याला 51 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. राज्य सरकारने कांद्याच्या बाबतीत धोरण ठरवावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने कांद्याच्या भावात तब्बल बाराशे रुपये प्रतिक्विंटलने विक्रमी घसरण झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्तम प्रतिचा कांदा ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचला होता. मात्र, दहाच दिवसांनी दर ५०० ते ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कोसळला. फेब्रुवारीतल्या भाववाढीने कांदा उत्पादकांचा उत्साह वाढला होता, पण महिन्याभरातच निराशेचे वातावरण तयार झाले आहे.
सातारा व पुणे जिल्ह्याच्या लोणंद बाजारपेठेत ४ महिन्यापूर्वी कांद्याचा दर ८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल होता. फेब्रुवारीत ९०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर पोहचला. मात्र, नाशिक, नगर, सोलापूर या महत्त्वाच्या कांदा बाजारपेठांमध्येही आवक प्रचंड वाढली आहे. यामुळे भाव कोसळल्याचे सांगितले जात आहे.
पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निम्म्यापेक्षा अधिक कांदा प्रतिकूल हवामानाने गेला होता. त्यातच घसरलेल्या दराने ते आणखीनच तोट्यात गेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती असली तरी निर्यात चालूच आहे. नाशिक-नगरसह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या सर्वच राज्यात आवक वाढल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगण्यात येते.