महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली माहिती
नाशिक – यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करतांना जर ८ ते १० रुपये प्रति किलोचा दर देणार असेल तर महाराष्ट्रातून नाफेडला एक किलोही कांदा घेऊ देणार नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.
नाफेड दरवर्षी कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी राज्यातील काही ठराविक बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करत असते गेल्या चार-पाच वर्षांपासून बाजार समित्यांच्या खरेदीसह काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनाही नाफेडने कांदा खरेदीचे अधिकार दिलेले आहे. मागील वर्षी नाफेडच्या एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदी पैकी महाराष्ट्रातून ७५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी नाफेडकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलो आठ रुपये ते अकरा रुपये इतका दर देण्यात आला होता.
फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांनाही नाफेडणे हाच दर ठरवून दिल्याने त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांच्या कांद्याला वरील प्रमाणे दर मिळाला होता. परंतु नाफेडची कांद्याचा दर ठरवण्याची ही पद्धत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मान्य नसून यावर्षी महाराष्ट्रात नाफेड मार्फत शेतकऱ्यांकडून जी काही कांदा खरेदी केली जाणार आहे तो कांदा प्रति किलो ३० रुपये या दराने खरेदी करावा अन्यथा महाराष्ट्रातून नाफेडला १ किलोही कांदा घेऊ दिला जाणार नाही. खते औषधे बियाणे मजुरी व डिझेलचे दर वाढल्याने त्याचबरोबर अवकाळी पाऊस गारपीट बोगस प्रतीचे कांदा बियाणे प्रति एकरी कांद्याचा उत्पादन खर्च उत्पादन ७० ते ८० हजार रुपये इतका येत असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर मिळावा यासाठी नाफेड नाही शेतकऱ्यांचा कांदा प्रति किलो ३० रुपये या दराने खरेदी करावा ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची या मागील प्रमुख भूमिका आहे.
मागील वर्षी नाफेडने स्वतः व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमार्फत जो काही कांदा खरेदी केला त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळालेला दराच्या पाचपट म्हणजेच कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर ४० ते ५० रुपये किलोने विक्री केला गेला.
नाफेडचे काम हे काही नफा कमावण्याचे नाही. तर कांद्याचे दर अचानक वाढल्यानंतर देशात ग्राहकांना स्वस्तात कांदा पुरविण्यासाठी किमती स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी करत असते. परंतु मागीलवर्षी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कांद्याला नंतर मात्र पाचपटीने भाव भेटल्यानंतर नाफेड कडून संबंधित शेतकऱ्यांना कुठलाही वाढीव मोबदला देण्यात आला नव्हता. ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उघड-उघड फसवणूकच आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात नाफेडला जो काही कांदा खरेदी करावयाचा असेल त्यासाठी नाफेडणने शेतकऱ्यांच्या कांद्यास कमीत कमी ३० रुपये प्रति किलोचा दर द्यावा ही ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून घेतली जाणार आहे. केवळ ठराविक जिल्ह्यांतूनच कांद्याची खरेदी न करता राज्यातील सर्वच कांदा उत्पादक जिल्ह्यांतून नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा असेही भारत दिघोळे यांनी यावेळी सांगितले.