योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. यातूनच केंद्र व राज्य सरकारविषयी असंतोष निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. तालुक्यातील शिरसगाव येथे शेतकरी संघटनेने नाफेडच्या कांदा खरेदी वरून मंत्री डॉ. पवार यांना घेराव घातला. यावेळी शेतकरी आणि मंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. त्यामुळे याठिकाणचे वातावरण काही काळ तणावाचे बनले.
नाफेडने जागतिक बाजारभावा प्रमाणे कांदा खरेदी करावी, खरेदी केलेला कांदा बाजारात न आणता तो समुद्रात बुडवावा, अशी संतप्त मागणीही शेतकऱ्यांनी केली. यावेळी मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे, असे सांगितले. तर शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी नाफेडची कांद्याची खरेदी ही चुकीच्या पद्धतीचे असल्याचे सांगत शेतमालाला भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांच्यात बराच वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे,आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असे मंत्री डॉ. पवार म्हणाल्या.
निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजनासाठी मंत्री डॉ. पवार आल्या होत्या,. त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे व रामकृष्ण बोंबले, नवनाथ कदम, भीमराव बोराडे, तानाजी बोराडे, सुकदेव पागेरे, भाऊसाहेब भंडारे, हरीभाऊ मोगल इतर शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराचा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी मंत्री डॉ. पवार व व शेतकरी संघटने नेते अर्जुन बोराडे हे दोघेही आक्रमक झालेले पहायला मिळाले. लाल कांद्याला मागणी नाही, नाफेड आजपर्यंत लाल कांदा खरेदी करत नव्हते, परंतु पहिल्यांदाच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांसाठी लाल कांदा नाफेड खरेदी करत आहे, नाफेडच्या खरेदीमुळे भाव वाढतात, स्पर्धा तयार होते, नाफेड शेतकऱ्यांसाठीच आहे, असे डॉ पवार यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अर्जुन बोराडे म्हणाले की, नाफेडची खरेदी ही काही कामाची नसून ती जागतिक पातळीप्रमाणे झाली पाहिजे. भाजपचे युवा नेते ओझरचे यतीन कदम यांनी मध्यस्थी करत ताईंना दिल्ली फ्लाईट आहे, या विषयावर पुन्हा आपण स्वतंत्र चर्चा करू असे सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते तसेच शिरसगाव, कोकणगाव, थेरगाव, कसबे सुकेणे या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Onion Issue Farmers and Minister Bharti Pawar Conflict