मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या निर्णयाने सर्व कांद्याचा वांदा निर्माण झाला आहे. कांदा प्रश्नावरून शेतकरी, व्यापारी आक्रमक झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्लीला गेले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त जपानी दौऱ्यातून वेळ काढत फोन केला आहे. एकुणच काय तर कांद्याचा प्रश्न सोडविण्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे राज्यातले संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (२२ ऑगस्ट) केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ सध्या जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करून राज्यातील जनतेला महत्त्वाची माहिती दिली.
केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी म्हटले की कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. २,४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी केली जाईल. धनंजय मुंडे हे पीयूष गोयल यांना भेटण्यापूर्वीच जपानमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून बातचीत केली. तसेच पीयूष गोयल यांनाही फोन करून याप्रकरणी काय तोडगा काढता येईल याबाबत चर्चा केली. त्यापाठोपाठ फडणवीस यांनी ट्वीट करून कांदा प्रश्नावर केंद्र सरकार काय काय करतेय याबाबत माहिती दिली. त्यामुळे कांदा प्रश्नावर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे, अजितदादांनी दिले उत्तर
कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये उत्तर देताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे पियुष गोयल यांना भेटले, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली तर यात तुमची अडचण काय? दोघेही सरकारमधील घटक आहेत. ही श्रेयवादाची लढाई अजिबात नाही, असे स्पष्ट केले आहे. तर “ते श्रेयवादवाले घरी बसले आहेत”. मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
Onion Issue Credit Politics Maharashtra Government
Shinde Fadanvis Pawar