नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक व धुळे जिल्ह्यात मागील एक ते दीड महिन्यापूर्वी गारपिट व अवकाळी पावसाने शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे अनुदान वर्ग करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच कांदयास 350 रु अनुदान घोषित केले आहे त्यास मुदत वाढवून द्यावी व उन्हाळी कांदयाची नाफेड मार्फ़त तात्काळ खरेदी चालू करावी अशी मागणी खा .डॉ. सुभाष भामरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
धुळे लोकसभा मतदार संघातिल शेतकऱ्यांचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हाता तोंडाशी आलेला घास गारपीट व अवकाळी पावसामुळे वाया गेला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे, शेती मालाचे जे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे झाले असून प्रशासनाने तात्काळ अहवाल राज्य शासनास सादर करावा त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करता येईल.
तसेच मागील काळात कांद्याला कमी भाव होता तेव्हा राज्य शासनाने 350 रु प्रति क्विंटल अनुदान घोषित केले होते त्याची मुदत वाढवून द्यावी व आता उन्हाळी कांदयाची नाफ़ेड मार्फ़त तात्काळ कांदा खरेदी चालू करण्यात यावी जेणे करून शेतकरी वर्गास थोड़ा दिलासा मिळेल अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.सुभाष भामरे यानी केली असून लवकरात लवकर प्रशासनाकड़ून पंचनाम्याचे अहवाल राज्य शासनास प्राप्त झाल्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
तसेच उन्हाळी कांदयाची खरेदी नाफेड मार्फ़त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,व 350 रु अनुदानासाठी मुदत वाढवून देण्याविषयी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ .सुभाष भामरे यांना दिले.
Onion Farmers 350 Rs Government