नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते भारतीय औषधनिर्माण परिषदेच्या ‘वन स्टॉप-नॉन स्टॉप’ या डिजिटल रोजगार पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. हे पोर्टल, औषधनिर्माण व्यावसायिकांसाठी तसेच उद्योगातील नोकरदारांसाठी उपयुक्त ठरेल. लहान शहरे आणि खेड्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल गेमचेंजर ठरेल, असे डॉ. पवार यांनी उदघाटनाच्या वेळी सांगितले.
राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण दिनानिमित्त त्यांच्या हस्ते, औषधनिर्माण अन्वेषण-२०२३ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय औषधनिर्माण शिक्षणव्यवस्थेचे जनक प्रा. एम.एल. श्रॉफ यांच्या जयंती निमित्त हा दिवस साजरा केला जातो . शैक्षणिक संशोधन संस्थांचा उद्योगांसोबत समन्वय घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून शिक्षणक्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील एकत्रित संशोधनांच्या परिणामांच्या फायद्यांची देवाणघेवाण होऊ शकेल. औषध निर्माण शिक्षणक्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील ही सांगड, या क्षेत्रातील व्यवसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
“नवोन्मेष हे केवळ विज्ञानाचे उद्दिष्ट नसावे, तर नवोन्मेष, वैज्ञानिक प्रक्रिया पुढे नेणारे इंजिनही ठरावे,” या पंतप्रधानांच्या शब्दांचा पुनरुच्चार करत, त्यांनी प्रत्येकाला आवश्यकतेच्या आधारावर औषध निर्मितीवर काम करण्याचे आवाहन केले तसेच एएमआर म्हणजे औषधांनाही न जुमानणाऱ्या जंतूविरोधातल्या लढ्यात (अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स) औषधनिर्मात्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. त्यांनी पीसीआय आणि औषधनिर्माण संस्थांना औषधे आणि त्याचा वापर, स्वच्छतेचे महत्त्व, सामुदायिक रोग प्रतिबंधक, सर्वेक्षण आणि डेटा संकलन याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची सूचना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारने देशाच्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी यशस्वी पाया घातला आहे, असेही डॉ. पवार यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारने एक लवचिक, कार्यक्षम आणि परिस्थितीशी अनुकूल आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दिशेने मनुष्यबळविकसित करण्यास प्राधान्य दिले आहे, असे त्या म्हणाल्या. औषधनिर्माण परिषदेने जागतिक स्तरावर होत असलेल्या बदलांसोबत आपल्या विकासाची गती कायम ठेवावी, यावर त्यांनी भर दिला. तसेच या क्षेत्रात संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले, जेणेकरून भारतीय औषधनिर्माण क्षेत्र जगाला नवोन्मेषासाठी मार्गदर्शन करु शकेल, असे त्यांनी सांगितले.
जगाचा आज भारतावर विश्वास आहे आणि या कमावलेल्या विश्वासाने भारताला “जगाचे औषधालय ” अशी ओळख मिळवून दिली आहे, असे भारती पवार म्हणाल्या. भारतात उत्पादित झालेली आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक वापरत असलेली औषधे उच्च दर्जाची आहेत आणि आपली मानके जागतिक उत्पादन प्रोटोकॉलचे पालन करतात हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे, ज्यामुळे “जगातील प्रमुख औषधनिर्माण केंद्र” म्हणून भारताची प्रतिष्ठा सुनिश्चित होईल आणि ग्राहकांना उच्च दर्जाची औषधे उपलब्ध होतील.” अशी सूचना त्यांनी केली. उच्च दर्जाची जेनेरीक औषधे, वैद्यकीय उपकरणे देशात निर्माण करुन तसेच, संरक्षण आणि विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमता वाढवून हे उद्दिष्ट साध्य करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
नोकरी इच्छुकांनी वन स्टॉप-नॉन स्टॉप या नव्या पोर्टलला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
http://164.100.77.185/ERecruitment/index.do