नाशिक – केंद्र शासनाच्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेतंर्गत संबंधित रेशन दुकानात आधार प्रमाणिकरण करुन लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्हयातून धान्य घेण्याची सोय उपलब्ध आहे. माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षभराच्या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा ९४ लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी एका शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, केंद्र शासनाच्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेतंर्गत सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन लाभधारक धान्य घेत आहे. राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील कोणताही एन.एफ.एस.ए
कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेतंर्गत १५ एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील ६ हजार ३२० शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमधून धान्य घेतले आहे. तसेच इतर राज्यातील ३ हजार ५२१ शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून धान्य घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. नरसीकर यांनी दिली आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी हेल्पलाइन कार्यान्वित
राज्यातील रास्तभाव दुकानांतून कामगार, ऊसतोड ,मजूर, आदिवासी आदी स्थलांतर करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानांत त्यांना मंजूर असलेले धान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येत असते. ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेच्या माहितीकरिता हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आलेली असून नागरिकांनी १४४४५ या हेल्पलाइनवर संपर्क साधून योजनेविषयी माहिती घेण्याचे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी केले आहे.