इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी एक देश एक निवडणूक विधेयक मंगळवारी संसदेमध्ये सादर होणार आहे. या विधेयकात आवश्यक घटनादुरुस्ती लोकसभेत मांडली जाणार आहे. यासाठी सत्ताधारी पक्षाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण देशभरात एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी हे विधेयक आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप एक देश एक निवडणूकच्या फायद्याची यादी वाचत आहे. या माध्यमातून संपूर्ण देशभरात एकाच वेळी निवडणूक घेण्यात आली तर खर्च कसा वाचेल व त्याचे फायदे काय हे स्पष्टपणे ते सांगत आहे. एक देश एक निवडणुकीच्या अंमलबजावणी झाली त्यातून खर्च कमी होईल. प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल असे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे.
हे विधेयक लागू करण्यासाठी किमान सहा विधेयके मांडावी लागणार आहे. त्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात एनडीएचे बहुमत असले तरी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळवणे गरजेचे आहे. एनडीएकडे लोकसभेच्या ५४५ पैकी २९२ जागा आहेत. दोन तृतीयांश बहुमताचा आकडा ३६४ आहे. राज्यसभेच्या २४५ जागांपैकी एनडीएकडे ११२ तर विरोधी पक्षाकडे ८५ जागा आहेत. सरकारला दोन तृतीयांश बहुमतासाठी किमान १६४ मतांची गरज आहे.