इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोकसंख्या वाढविण्यासाठी एखादा देश जोडप्यांना सुटी देऊन एकांत घालविण्याची संधी देणारी योजना आणत असेल तर त्याचे आश्चर्य वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यातही ज्या देशाची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे, त्या देशाने हा निर्णय घेतला असेल तर आणखीनच आश्चर्याची बाब आहे. होय! चीननेच हा निर्णय घेतला असून सध्या लोकसंख्या घटल्याच्या चिंतेने चीनला ग्रासले आहे.
लोकसंख्या घटल्यामुळे चीन सरकार टेंशनमध्ये आले आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यात आता एक नवी ऑफर चीन सरकारने आणली आहे. ही अॉफर ऐकून साऱ्या जगातील तरुण जोडप्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. चीन सरकार नवविवाहित जोडप्यांना विशेष वैवाहिक रजा देत आहे. त्यासोबतच ३० दिवसांची विशेष रजा देण्याची घोषणाही सरकारने केली आहे.
चीनमधील तरुण लग्नाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे चीनमधील जन्मदर घसरला आहे. अशात नवनव्या योजनांच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचा सरकारचा उद्देश्य आहे. नवविवाहित जोडप्यांनी सुटीवर जावे, एकांतात वेळ घालवाला, जेणेकरून प्रजनन दर वाढेल, असा सरकारचा समज आहे. असे झाले नाही, तर देशाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असे सरकारने म्हटले आहे. अर्थात ही चिंता चीनला आज नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून सतावत आहे. त्यामुळे देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी सरकार सातत्याने कुठल्या ना कुठल्या उपाययोजना राबवित आहे.
तरुणांचा लग्नाला नकार
चीनमधील नवी पिढी लग्नाच्या बाबतीत फार सिरीयस नाही. त्यांना संसारिक आयुष्यात अडकून पडायचे नाही, त्यामुळे ते सरसकट लग्नाला नकार देत आहेत. याच महिला आणि पुरुष दोन्हींचा समावेश आहे. लग्न होत नसल्यामुळे जन्मदर घसरला आहे. परिणामी देशाची लोकसंख्याही सातत्याने घटत आहे.
म्हाताऱ्यांचा देश
चीनचा जन्मदर सातत्याने घसरत असल्याने आता तो म्हाताऱ्यांचा देश म्हणून जगात ओळखला जाऊ लागला आहे. २०२२ मध्ये गेल्या साठ वर्षांतील सर्वांत कमी लोकसंख्या चीनमध्ये नोंदविली गेली. २०२१ मध्ये १ कोटी ६२ लाख बालकांचा जन्म झाला होता आणि २०२२ मध्ये हा दर ९५ लाखावर येऊन घसरला.
अर्थव्यवस्थेला फटका
चीनची लोकसंख्या २०२१ मध्ये १४१ कोटी २६ लाख होती आणि २०२२ मध्ये त्यात घट होऊन १४१ कोटी १८ लाख एवढी लोकसंख्या झाली. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. एकीकडे भारतात लोकसंख्या नियंत्रण हा गंभीर विषय असताना शेजारच्या देशात मात्र लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न होत आहेत.
One Month Leave for Couple Population Increase