नवी दिल्ली – देशात ओमिक्रॉन वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सर्व राज्य सरकारांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली असून, नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध लावले आहेत. काही राज्यांमध्ये १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी परदेशातून येणार्या कोरोनाबाधित प्रवाशांसाठी स्थानिक पातळीवर विलगीकरण अनिवार्य केले आहे. कोणत्या राज्यांनी काय निर्बंध लावले आहेत ते जाणून घेऊया.
दिल्ली
ओमिक्रॉन रुग्णांची राजधानी झालेल्या दिल्लीत बुधवारी सहा महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंदणी झाली आहे. दिल्ली सरकारने नाताळ आणि नव्या वर्षांच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. कोणत्या कार्यक्रमात नागरिकांची मर्यादा किती असावी याबद्दल निर्णय घेतला नसला तरी सरकारने सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, धार्मिक, सांस्कृतिक आणि सणासंदर्भातील जल्लोषावर बंदी घातली आहे. बँक्वेट हॉलमध्ये बैठका, परिषदा, लग्नकार्ये आणि प्रदर्शनाशिवाय कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. रेस्टॉरंट आणि बार ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील नोएडा आणि लखनऊमध्ये योगी सरकारकडून ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल
बंगाल सरकारने बुधवारी जोखीम असलेल्या देशातून भारतात येणार्या कोरोनाबाधितांसाठी सात दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य केले आहे. तसेच जिनोम सिक्वेंन्सिंगमध्ये कोणीही ओमिक्रॉनबाधित आढळल्यास संबंधित रुग्णाला सलग दोन आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत रुग्णालयातून घरी जाता येणार नाही, असे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र
ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचे संकेत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे त्या म्हणाल्या. बुधवारपर्यंत राज्यात ओमिक्रॉनने बाधित ६५ रुग्णांची नोंदणी झाली आहे. बृहन्मुंबई महापालिकेने नाताळ आणि नव्या वर्षाच्या जल्लोषासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. इनडोअरमध्ये ५० टक्क्यांच्या क्षमतेने कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खुल्या परिसरात २५ टक्के क्षमतेने कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते.
हरियाणा
हरियाणात एक जानेवारीपासून १८ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच हॉटेल, बार, शॉपिंग मॉल, मद्याची दुकाने, धान्य बाजार, स्थानिक बाजारात प्रवेश करण्यासाठी पूर्ण लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या सरकारी कर्मचार्यांनाच कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच ट्रक आणि ऑटोरिक्षामध्ये प्रवास करण्याचा निर्णय संबंधित संघटनांनी घेतला आहे. हरियाणात आतापर्यंत ९३ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर फक्त ६० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत.
कर्नाटक
आरोग्य विभागाने बुधवारी आदेश दिला की, कोरोनाबाधितांच्या पहिल्या आणि दुसर्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग २४ तासांच्या आत करण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे १९ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण विनालक्षण आहेत. सरकारकडून क्लब, रेस्टॉरंट आणि हॉटेलांवर ३० डिसेंबरपर्यंत अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.
केरळ
कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या केरळमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण वाढून २४ झाले आहेत. केरळमध्ये सध्या जोखीम नसलेल्या देशातून येणार्या प्रवाशांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिंग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुदरातमध्ये राज्य सरकारने आठ मोठ्या शहरात ३१ डिसेंबरपर्यंत रात्रीची संचारबंदी वाढविली आहे.