इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकानंतर एक समोर येत असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. भारत आणि जगाला मोठ्या प्रमाणात प्रभावित केलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासून सुटका होत नाही की ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. आता यामध्ये आणखी एका व्हेरिएंटने एन्ट्री केली आहे.
कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे नाव डेल्टाक्रॉन (Deltacron) असे आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सायप्रस येथे एक नवा कोरोना व्हेरिएंट डेल्टाक्रॉन आढळला आहे. डेल्टा व्हेरिएंटसारखीच डेल्टाक्रॉनची अनुवांशिक पार्श्वभूमी आहे. या व्हेरिएंटमध्ये ओमिक्रॉनसारखीच काही उत्परिवर्तन (म्युटेशन) आढळले आहे. त्यामुळेच याला डेल्टाक्रॉन असे संबोधले जात आहे.
सध्या चिंतेची बाब नाही
तज्ज्ञांच्या माहितीनुसार सध्या या व्हेरिएंटमुळे चिंतेची बाब नाही. सायप्रसमध्ये घेण्यात आलेल्या २५ नमुन्यांपैकी ओमिक्रॉनचे १० म्युटेशन आढळले आहेत. जेरूसलम पोस्टने सायप्रस मेलचा हवाला देत सांगितले की, नमुने घेतलेल्या रुग्णांपैकी ११ रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर १४ रुग्ण सामान्य नागरिकांमधून आले होते. सायप्रस विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि आण्विक व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लियोनडिओस कोस्त्रिकिस सांगतात, रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये म्युटेशनची फ्रिक्वेन्सी अधिक होती. हे नवा व्हेरिएंट आणि रुग्णालयात दाखल होण्यातील संबंधांकडे इशारा करत आहे.
वैज्ञानिक नाव घोषित नाही
कोस्त्रिकिस सांगतात, की नव्या व्हेरिएंटची डेल्टा व्हेरिएंटच्या समान अनुवांशिक पार्श्वभूमी आहे.
तसेच ओमिक्रॉनचे काही म्युटेशनही आहे. सायप्रसचे आरोग्यमंत्री मिखलिस हाडजीपांडेलस सांगतात, नव्या व्हेरिएंटमुळे चिंतीत होण्याची गरज नाही. नव्या व्हेरिएंटचे संशोधन झाल्याबद्दलही त्यांनी अभिमान व्यक्त केला. मंत्री म्हणाले की या संशोधनामुळे सायप्रसचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आले आहे. दरम्यान, या व्हेरिएंटचे वैज्ञानिक नाव अद्याप घोषित झालेले नाही.