नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आता युरोपसह जगातील वेगवेगळ्या भागात वेगाने फैलावत आहे. ब्रिटनमध्ये सलग तिसर्या दिवशी कोरोनाने सर्व विक्रम मोडित काढले असून, शुक्रवारी ओमिक्रॉनने बाधित ९३,०४५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका दिवसात मृत्यू झालेल्यांचा आकडा १११ वर पोहोचला आहे. एका दिवसापूर्वी युरोपमध्ये ८८ हजार रुग्ण आढळले होते. ताज्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १.१ कोटींच्या वर पोहोचली आहे. तर १ लाख ४७ हजार रुग्णांनी जीव गमावला आहे.
स्कॉटलँडच्या मंत्री म्हणाल्या…
स्कॉटलँडचे प्रथम मंत्री निकोला स्टर्जन म्हणाल्या, की ओमिक्रॉन आता देशात संसर्गाला कारणीभूत ठरला आहे. एका आठवड्यापूर्वी मी त्सुनामीचा इशारा दिला होता. आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. वेल्सचे नेते मार्क ड्रेकफोर्ड यांनी नागरिकांना ओमिक्रॉनच्या वादळाविरुद्ध तयार राहण्याचे आवाहन केले आहे. स्कॉकलँडमध्ये २६ डिसेंबरनंतर नाइट क्लब बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतातही रुग्ण वाढले
केंद्र सरकारने सांगितले की, देशातील ११ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनच्या रुपाचे १०१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे हे ओमिक्रॉन रुप युरोपासह जगातील इतर देशांमध्ये वेगाने फैलावत आहे. नागरिकांनी आवश्यक नसताना प्रवास टाळावा. सामुहिक समारंभ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजनही करू नये.
या राज्यात ओमिक्रॉनचा कहर
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की गेल्या २० दिवसांत कोविड रुग्ण दहा हजारांच्या आत आढळत आहेत. परंतु ओमिक्रॉन रूप आणि इतर देशात वाढणार्या रुग्णांमुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. देशात विविध राज्यांमधील ओमिक्रॉनच्या स्थितीबद्दल ते म्हणाले, की महाराष्ट्रात ३२, दिल्लीत २२, राजस्थानमध्ये १७, कर्नाटकमध्ये ८, तेलंगणामध्ये ८, गुजरातमध्ये ५, केरळमध्ये ५, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, चंडीगढ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
अनावश्यक प्रवास टाळा
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर)चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, की ओमिक्रॉन संपूर्ण युरोपमध्ये आणि जगातील इतर देशांमध्ये खूपच वेगाने फैलावत आहे. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच सामुहिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाऊ नयेत. पाच टक्क्यांहून अधिक कोविड संसर्गाचा दर असलेल्या जिल्ह्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत दोन आठवड्यात पाच टक्क्यांहून कमी संसर्गाचा दर होईपर्यंत अशा कठोर उपाययोजना राबविल्या जाव्यात.
कोरोनाचे नियम पाळा
लव अग्रवाल यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देताना सांगितले की, दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन हे रूप कोरोना विषाणूच्या डेल्टा रूपाच्या तुलनेत खूप वेगाने फैलावत आहे. तिथे डेल्टाचा प्रसार कमी होता. सामुहिक संसर्ग झालेल्या ठिकाणी ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा अधिक वेगाने होतो. किंबहुना तो त्यापुढेही निघून जातो. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासह मास्क घालणे, शारिरीक अंतर राखणे आणि स्वच्छ हाथ धुण्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.