नवी दिल्ली – ओमीक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराच्या प्रसारामुळे एकच खळबळ उडालेली असताना त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजारानंतर आता कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
एका दिवसात ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत ११.६ टक्के घट नोंदविली गेली आहे. या तेलाची किंमत आता प्रतिपिंप ७२.७२ डॉलर झाली आहे. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) कच्च्या तेलाच्या किमतीत १३.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. हे तेल प्रतिपिंप ६८.१५ डॉलरच्या स्तरावर पोचले आहे. युरोप आणि अमेरिकेकडून हवाई प्रवासावर मर्यादा घालण्यात आल्याने तसेच काही देशांमध्ये लॉकडाउन लावण्यात आल्याने आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होऊ शकतात. परिणामी महागाईला आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भारतीय शेअर बाजारात १६८८ अंकांची घसरण शुक्रवारी पहायला मिळाली. शेअर बाजारात अजूनही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डिसेंबरला ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज (ओपेक)च्या सदस्य देशांची बैठक होणार आहे. भारत, अमेरिका, जापान, कोरिया, चीन यासारख्या देशांनी कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी आपले आपत्कालीन भांडार खुले करून दिले आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत तेलाचे उत्पादन आणि त्याच्या किमतीविषयी पुढील रणनीती ठरणार आहे.
ओपेक देशांचे लक्ष
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर ओपेक देशांचेही लक्ष असणार आहे. त्यानुसारच ओपेक देश पुढील निर्णय घेतील. नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा खप कमी होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यावर स्थानिक पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचा उत्पादन खर्च कमी होण्यास १० ते १५ दिवस लागू शकतात.