नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराबद्दल चिंता व्यक्त होत असताना दक्षिण अफ्रिकेतील डॉक्टरने या व्हेरिएंटच्या लक्षणांचा खुलासा केला आहे. या व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या रुग्णांवर हे डॉक्टर उपचार करत आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या रुग्णांमध्ये अपरिचित लक्षणे होती. ही लक्षणे खूपच सौम्य होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल न करताच रुग्ण बरे झाले आहेत.
दक्षिण अफ्रिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अँजेलिक कोएत्झी सांगतात, गेल्या दहा दिवसात त्यांनी या व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या ३० रुग्णांचे निरीक्षण केले. त्या रुग्णांमधील लक्षणे अपरिचित होती. ओमिक्रॉनमुळे अत्याधिक थकवा, मांसपेशींमध्ये वेदना, घशात खवखव जाणवणे आणि कोरडा खोकला येणे ही लक्षणे अधिक पाहण्यात आली. काही रुग्णांमध्ये थोडा जास्त ताप होता. अफ्रिकेत डेल्टा या जुन्या कोरोना व्हेरिएंटच्या तुलनेत सध्याची परिस्थिती खूपच वेगळी आहे, असा इशारा कोएत्झी यांनी आरोग्य अधिकार्यांना दिला होता. परंतु तोपर्यंत संशोधक जुन्या व्हेरिएंटवरच काम करत होते.
कोएत्झी सांगतात, आगामी काळात गंभीर आजार येणार नाही असे आम्ही म्हणत नाही आहोत. परंतु आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या लस न घेतलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. युरोपमध्ये यापूर्वीच अनेक नागरिक या व्हेरिएंटमुळे संक्रमित झाल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. कोएत्झी यांनी उपाचार केलेल्या रुग्णांचे वय ४० वर्षांहून कमी होते. ते सगळेच पुरुष होते. त्यांच्यापैकी निम्म्याहून कमी पुरुषांनी लस घेतली होती.
कोएत्झी सांगतात, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे दक्षिण अफ्रिकेची खूपच बदनामी झाली आहे. परिणामी अनेक देशांनी दक्षिण अफ्रिकेच्या प्रवाशांवर प्रवासास बंदी घातली आहे. त्यामुळे सगळे देश दक्षिण अफ्रिकेला वेगळे पाडत आहेत. दक्षिण अफ्रिकेच्या आरोग्य महासंघाने यावर चिंता व्यक्त केली आहे.
अँजेलिक कोएत्झी म्हणाले, दक्षिण अफ्रिकेच्या संशोधकांनी सतर्कता दाखवली असून, त्यांच्यावर टीका न करता कौतुक केले पाहिजे. आमचे शास्त्रज्ञ खूपच सतर्क आहेत आणि खूपच गंभीरतेने काम करत आहेत. परंतु युरोपीय देशांनी या लक्षणांवर खरोखरच गंभीरता दाखविली का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.