नवी दिल्ली – केंद्र सरकारने ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत तीन पटीहून अधिक संक्रामक आहे. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारांनी वॉर रूम सक्रिय करून जिल्हा आणि गावपातळीवर त्वरित कठोर कारवाई करावी.
देशात २०० हून अधिक रुग्ण
देशात ओमिक्रॉनने बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत आतापर्यंत १४ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशात आतापर्यंत २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत रुग्णांची संख्या वाढून ५४ झाली आहे. म्हणजेच देशातील प्रत्येक चौथा व्यक्ती दिल्लीत बाधित आहे. केंद्राने राज्यांना पत्र लिहून वॉर रूम सक्रिय करण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात ७७ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत किंवा ते देशाच्या बाहेर गेले आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी ११ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. देशातील कोणत्याही राज्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. दिल्लीत मंगळवारी ओमिक्रॉनचे २४ नवे रुग्ण आढळले. एकूण ५४ रुग्णांपैकी ३४ रुग्णांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १७ जण बरे होऊ घरी परतले आहेत.
रुग्णांना सौम्य लक्षणे
दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातून मंगळवारी आणखी पाच रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. दिल्लीत मंगळवारी सायंकाळपर्यंत दाखल करण्यात आलेल्या ३१ रुग्णांमधील बहुतांश जणांना कोणतीच लक्षणे नव्हती. लोकनायक रुग्णालयात दाखल तीन रुग्णांना घसा दुखण्यासारखे सौम्य लक्षणे होती. खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना काहीच लक्षणे नव्हती.
राज्यांना या सूचना
देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, की परीक्षण आणि देखरेख वाढविण्यासह रात्री संचारबंदी लावणे, मोठ्या सभांमध्ये कठोर नियम पाळणे, लग्न आणि अंत्यसंस्कार कार्यक्रमांमध्ये नागरिकांची संख्या कमी करण्यासारखे रणनीतीक निर्णय लागू करावेत. कोविड रुग्ण वाढण्याच्या सुरुवातीच्या संकेतांसह चिंता वाढविणार्या ओमिक्रॉन रुग्णांचा शोध घेण्यासाठी विविध उपाययोजना लागू कराव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
संसर्ग रोखण्यासाठी रणनीती आवश्यक
पत्रात सांगण्यात आले आहे की, जिल्हापातळीवर कोरोनाने प्रभाविक नागरिक, भौगोलिक प्रसार रुग्णालयाच्या पायाभूत सुविधेचा वापर, श्रमशक्ती, प्रतिबंधित क्षेत्रे अधिसूचित करणे आदी नियमांच्या संदर्भात वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. या पद्धतीने रणनीती बनविल्यास इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्यापूर्वी स्थानिक पातळीवरच तो नियंत्रित व्हावा.
कर्नाटक, मुंबईत कठोर निर्बंध
ओमिक्रॉन धोक्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये नव्या वर्षाच्या आगमनानिमित्त आयोजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात न्यू इयरच्या सामुहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने खुले राहतील. मुंबईत पार्टीत २०० पेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करण्यासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. गुजरामध्ये नव्या वर्षाच्या जल्लोषावर लगाम लावण्यासाठी अनेक शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.