नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा अनेक देशांत डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक प्रबळ ठरत असल्याचे चित्र आहे. जगातील १०८ देशांमध्ये केवळ एका महिन्यातच ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यावरूनच त्याच्या गतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. आतापर्यंत जगात ओमिक्रॉनबाधितांची संख्या १.५२ लाखपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण अफ्रिकेत २४ नोव्हेंबरला पहिला रुग्ण आढळला होता. कोणत्या देशांमध्ये ओमिक्रॉन डेल्डाहून अधिक घातक सिद्ध होत आहे हे पाहुया.
ब्रिटेनमध्ये पाच एप्रिलपर्यंत डेल्टाचे ०.१० टक्के रुग्ण आढळत होते. मेअखेरपर्यंत वाढून आकडा ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. जूनमध्ये ९० टक्क्यांहून अधिक डेल्टाचेच रुग्ण आढळले होते. तर ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये एका महिन्याच्या आत कोरोना संसर्गाचे सर्व विक्रम मोडित निघाले आहेत. २२ डिसेंबरला ब्रिटनमध्ये एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळण्याचा हा विक्रमच आहे.
अमेरिकेत दर चौथा व्यक्ती
अमेरिकेत १९ एप्रिलपर्यंत आढळणार्या कोरोनारुग्णांमध्ये ०.३१ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे होते. जूनअखेरपर्यंत हा आकडा वाढून ५० टक्क्यांवर पोहोचला. एका महिन्यानंतर जुलैअखेरपर्यंत ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण डेल्टा व्हेरिएंटनेच बाधित होते. तर ओमिक्रॉनने शिरकाव केल्यानंतर अमेरिकेत संसर्गाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २२ डिसेंबरपर्यंत अमेरिकेत दर चौथा व्यक्ती ओमिक्रॉनबाधित आढळत आहे.
भारतात २२ दिवसांतच १७ राज्य
भारतात डिसेंबर २०२० च्या अखेरीस डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या एका महिन्यात एकूण रुग्णांमध्ये ०.७३ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आढळले होते. तर भारतात फक्त २२ दिवसातच ओमिक्रॉन १७ राज्यांमध्ये पसरला आहे. २ डिसेंबरला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण समोर आला होता. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ३५८ रुग्ण आढळले आहेत.
जर्मनीत संसर्गाचा वाढता वेग
जर्मनीत डेल्टा व्हेरिएंटची सुरुवात झाल्यानंतर ०.६९ टक्के रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ त्यादरम्यान डेल्टाचे खूपच कमी रुग्ण आढळले होते. तर ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याच्या काही दिवसानंतर एकूण ९ टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित आढळत आहेत.
अफ्रिकेत ९५ टक्के रुग्ण
दक्षिण अफ्रिकेत मे महिन्याच्या सुरुवातीला फक्त २ टक्के रुग्ण डेल्टाचे आढळले होते. १२ जुलैपर्यंत वाढून तो ८९ टक्क्यांवर पोहोचला होता. तर २४ नोव्हेंबरला पहिला ओमिक्रॉनबाधित आढळला होता. १३ डिसेंबरपर्यंत ओमिक्रॉन हा दक्षिण अफ्रिकेतील प्रमुख व्हेरिएंट ठरला. सध्या ९५ टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनबाधितच आढळून आहेत.
कोण किती धोकादायक?
ओमिक्रॉन
आतापर्यंत कोरोना विषाणूचे एकूण ५३ उत्परिवर्तन (म्युटेशन) झाले आहेत. त्यामधील ३२ म्युटेशन तर त्याच्या स्पाइक प्रोटिनमध्येच झाले आहेत. रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्येही १० म्युटेशन झाले आहेत. ओमिक्रॉनचे आर मूल्य डेल्टाहून जवळपास सहा पटीने अधिक आहे. याचाच अर्थ असा होतो की, एका ओमिक्रॉनबाधिताकडून ३५ ते ४५ नागरिकांना ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो. या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटिनमध्ये ३० हून अधिक म्युटेशन झाल्यामुळे यावरील सध्याची लस खूपच कमी प्रभावी असल्याची शक्यता आहे.
डेल्टा
या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटिनमध्ये एकूण १८ म्युटेशन झाले होते. स्पाइक प्रोटिनच्या माध्यमातून हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. तर डेल्टा व्हेरिएंटमध्ये केवळ दोनदाच म्युटेशन झाले होते. विषाणूचा रिसेप्टर बाइंडिंग डोमेन हा भाग माणसाच्या शरिरातील नसांच्या सर्वप्रथम संपर्कात येतो. त्याचा आर व्हॅल्यू ६-७ होती. म्हणजेच एका डेल्टाबाधितामुळे ६ ते ७ व्यक्ती बाधित होऊ शकतात. कोविशिल्ड लस यावर खूपच प्रभावी ठरली होती.