नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. हा व्हेरिएंट कोरोना विषाणूपेक्षा अधिक वेगाने पसरतो. लसीकरण आणि अँटिबॉडी या व्हेरिएंटवर किती परिणामकारक आहे हे ही कळू शकले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिकेतील देशांमध्ये प्रवासावर भारताने बंदी घातली नसली तरी पाच उपायांची घोषणा केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या व्हेरिएंटची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावून वरिष्ठ अधिकार्यांची चर्चा केली. आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू करण्यासंदर्भातील योजनांचा पुन्हा आढावा घ्यावा अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. नंतर ओमिक्रॉन व्हेरिएंटवर गृहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात आल्यानंतर काय उपाय करावे याविषयी लक्ष केंद्रित करण्यात आले.
केंद्र सरकारने विशेष पंचसूत्री तयार केली आहे. त्याद्वारे नव्या अवताराला सक्षमपणे तोंड देता येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. भारतात प्रवेश करणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्रवासापूर्वी १४ दिवसांच्या प्रवासाचे विवरण जमा करावे लागणार आहे. हवाई सुविधा पोर्टलवर आरटीपीसीआरचा कोरोना निगेटिव्ह अहवाल अपलोड करावा लागेल. जोखिमेच्या श्रेणीतील देशांच्या प्रवाशांचे आगमन झाल्यानंतर कोविड चाचणी करणे अनिवार्य असेल. कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत विमानतळावर वाट पाहावी लागेल. कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असेल आणि आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करण्यात आली तर संबंधितांना गृहविलगीकरणात राहावे लागेल. अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवस स्वतः देखरेख ठेवावी लागेल.
जोखिमेच्या श्रेणीतील वगळलेल्या देशांच्या प्रवाशांसाठी विमानतळाच्या बाहेर जाण्याची परवानगी असेल आणि आगमन झाल्यानंतर १४ दिवसांसाठी आरोग्याची स्वतः काळजी घेणे आवश्यक असेल. एकूण हवाई प्रवास करणार्यांपैकी पाच टक्के प्रवाशांना विमानतळावर चाचणी करावी लागेल. व्हेरिएंटची जिनोम सिक्वेन्सिंग आणखी बळकट आणि वेगाने करावी लागणार आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या जोखमिच्या देशांमध्ये दक्षिण अफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सावाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिंबाम्ब्वे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल आणि युरोपीय देशांचा समावेश आहे.