सातारा – टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय चमूतील तिरंदाज प्रवीण जाधव याच्या कुटुंबाला धमकी मिळाली आहे. त्याचे आई-वडिलांना गावात घर बनविण्याची इच्छा आहे. परंतु त्यांचे शेजारी घर बांधण्यास हरकत घेत असून, त्यांना धमक्या देत आहेत. घर बांधण्याची परवानगी मिळाली नाही, तर गाव सोडण्याची इच्छा त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील सराडे गावात प्रवीण जाधवचे पालक राहतात. तिथे त्यांचे दोन खोल्यांचे एक छोटे घर आहे. या ठिकाणी त्यांना नवीन घर बांधायचे आहे. संबंधित जागा आणि घर त्यांचेच असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तरीही शेजारील लोक त्यांना घर बांधण्यास मनाई करत आहेत. हा वाद मिटला नाही, तर गावच सोडून देऊ असे प्रवीणचे वडील रमेश जाधव यांनी सांगितले.
धमकी का देत आहेत शेजारील लोक
टोकियो ऑलिम्पिकमधून नुकताच घरी परतलेल्या प्रवीण जाधवने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. प्रवीण म्हणतो, माझे आई-वडील शेती महामंडळात मजुरीचे काम करत होते. त्याच महामंडळाने आम्हाला ही जमीन दिली होती. आमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर घर बांधण्यास सुरुवात केली. जमिनीचा सातबारा आमच्या नावाने केला नव्हता, फक्त तोंडी करार झाला होता.
भारतीय लष्करात भरती झाल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यानंतर आम्ही गावात दोन खोल्यांचे घर बांधले. तेव्हा शेजार्याने आम्हाला घर बांधण्यास मनाई केली नाही. परंतु जेव्हा आम्ही मोठे घर बांधण्याची योजना आखली. तेव्हा शेजार्यांनी त्यावर आक्षेप घेत ती जमीन त्यांची आहे, असा दावा केला. वाद झाल्यानंतर जमिनीचा काही भाग सोडण्यास तयार झाल्याचे प्रवीणने सांगितले.
वादावर लवकरच पडदा
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप म्हणाले, ती जमीन शेती महामंडळाचीच आहे. जाधव कुटुंबाने घर बांधण्याची तयारी केली तेव्हा शेजार्यांनी त्यावर आक्षेप घेत त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद करण्याची धमकी दिली. शिवाजी जाधव आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. हा वाद लवकरच मिटेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.