मुंबई – जगात दोन प्रकारचे वर्ग असतात एक म्हणजे ‘आहे रे’ आणि दुसरा ‘नाही रे’. कारण श्रीमंत आणि गरीब ही दरी हजारो वर्षापासून जगभरात कायम आहे. श्रीमंत लोकांना कोणती गोष्ट सहज उपलब्ध होऊ शकते. गरिबांना मात्र त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यातच एखाद्या वेळी दुर्धर आजार असेल तर त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची ताकद श्रीमंतांमध्ये असते. परंतु गरीब मात्र अशा प्रसंगी निरुपाय होतो, अशा वेळी कोणीतरी दानशूर व्यक्ती देवासारखी धावून येते आणि त्या गरिबाला मदत करते.
जगभरात दानशूर व्यक्तींची देखील कमतरता नाही, उद्योजक, अभिनेते, खेळाडू वैगेरे क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे येतात. मग भारत असो की अन्य कोणताही देश यातील खेळाडू देखील मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांना मदत करतात. परंतु एका परदेशी खेळाडूने नुकताच ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या आपल्या पदकाचा लिलाव केला असून एका अनोळखी बालकाची अवघड शस्त्रक्रियेसाठी हा निधी देण्याचे ठरविले आहे, याबद्दल या महिला खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलंडची महिला भालाफेक मारिया अँड्रझिझ हिने आठ महिन्यांच्या बाळावर हृदय शस्त्रक्रियेसाठी तिचे रौप्य पदक लिलाव केले आहे. मारियाने नुकतेच जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या गेम्समध्ये हे पदक जिंकले. या पदकाच्या लिलावातून तिने २ कोटी ५० लक्ष रुपये मिळवले आहेत, मात्र मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे २ कोटी ८६ लक्ष रुपये आवश्यक आहेत. यापुर्वी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मारिया चौथ्या स्थानावर होती. त्यानंतर तीला स्वतःला हाडांचा कर्करोग झाला, मात्र २०१८ मध्ये, हाडांच्या कर्करोगावर विजय मिळवून ती ट्रॅकवर परतली होती.
२५ वर्षीय मारियाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीला मदत करायची होती. तिने तिच्या फेसबुक पेजवर सांगितले की, त्या बाळासाठी ती पहिले निधी गोळा करणार आहे. तसेच त्या बाळावर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड हॉस्पिटलमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबत आणखी माहिती देताना मारिया म्हणाली की, पोलंडच्या स्टोअर जब्काने पदकासाठी बोली लावली आहे आणि रक्कम भरल्यानंतर ते पदक घेतले आहे.