टोकियो – ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज कांस्य पदक जिंकले. त्याच्या या विजयामुळे भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. टोकियोमध्ये उपांत्य सामन्यात बजरंगचा पराभव झाला होता. पण, त्याने शनिवारी (७ ऑगस्टला) कांस्य पदकासाठी होणा-या सामन्यात विजय मिळवला. कझाकस्तानच्या पहेलवानाला त्याने ८-० अशी धूळ चारली.
शुक्रवारच्या तिन्ही सामन्यात बजरंगने दर्जेदार खेळ केला. सकाळी त्याने ६५ किलो वजनीगटात बजरंगने किर्गिस्तानच्या अरनाजर अकमातालिव्हचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात इराणाच्या मोर्तेजा घियासी याच्यासोबत बजरंगची लढत झाली. या सामन्यात शेवटच्या काही क्षणात बजरंगने घियासीला लोळवून सामना जिंकला. या विजयाने पुनियाने उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. उपांत्य सामन्यात मात्र बजरंगला अझरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीव याने १२-५ असा फरकाने पराभूत केले. भारताचा कुस्तीपटू रविकुमार दहियाने रौप्यपदकावर नाव कोरल्यानंतर सर्वांच्या नजरा बजरंग पुनिया आणि सीमा बिस्लाकडे लागल्या होत्या. मात्र सीमा बिस्लाचा पराभव झाला. परंतु बजरंगने उत्कृष्ट कामगिरी करत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. आज त्या ख-या ठरल्या.