जयपूर – आपल्या मुलाने खूप शिकावे, मोठे व्हावे. तो मोठ्या पदावर जावा, त्याला पुरस्कार मिळावा असे प्रत्येक आईचे स्वप्न असते. प्रत्येक मुलगा ते स्वप्न पूर्ण करू शकेलच असे नाही. परंतु मुलाला देशातील ध्यानचंद खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होताना या समारंभात आईच उपस्थित राहू शकली नाही. पॅरालिम्पिक खेळाडू कृष्णा नागर याच्याबाबत ही दुर्दैवी घटना घडली आहे.
बॅडमिंटन खेळाडू कृष्णा नागर याच्या आईचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. कृष्णा नागरला पुरस्कार मिळण्याच्या काही तासांपूर्वीच त्याच्या आईचे शनिवारी निधन झाले. आईच्या निधनाचे वृत्त समजताच कृष्णा नागर राष्ट्रपती भवन येथे पोहोचण्यापूर्वीच जयपूरकडे रवाना झाला. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा देशातील १२ खेळाडूंची निवड केली होती. त्यामध्ये राजस्थानचे दोन पॅरालिम्पिक खेळाडू अवनी लेखरा आणि कृष्णा नागर यांचा समावेश होता.
कृष्णाची आई इंद्रा नागर या पाच दिवसांपूर्वी घराच्या छतावरून पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना जयपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी तब्येत खालावली आणि त्यांचे निधन झाले. शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. सन्मानित होण्यापूर्वीच कृष्णा जयपूरकडे रवाना झाला. २०२० मध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले होते.
राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत याने सांगितले, की कृष्णाच्या काकांचा शुक्रवारी रात्री बारा वाजता फोन आला होता. परंतु त्यांनी आणि साथीदारांनी कृष्णाला याबद्दल काहीच सांगितले नाही. आईची तब्येत खालावल्याचे कृष्णाला सांगण्यात आले.
आईला कार्यक्रमात आणण्याची होती इच्छा
प्रमोदने सांगितले, की कृष्णाची आई तीन दिवसांपूर्वी छतावरून अचानक पडली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यात येण्याची कृष्णाची इच्छा नव्हती. आईवर उपचार सुरू असल्याचे सांगत वडिलांनी त्याला पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाण्यास सांगितले. देशाचा सर्वोच्च सन्मान मुलाला मिळत असल्याचा आनंद त्याच्या वडिलांनाही झाला होता. कृष्णाला आपल्या आईला पुरस्कार सोहळ्यासाठी घेऊन जाण्याची इच्छा होती. परंतु त्याला एकट्याला जावे लागले आणि दुःखद बातमी समजल्यानंतर पुन्हा परतावे लागले.