अजय नेरकर, नामपूर
बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील वयोवृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने निर्घृण खून झाल्याची घटना २३ सप्टेंबरला रात्रीचे २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी काही वेळातच एका संशयित आरोपीला अटक केली आहे.
कोटबेल येथील घुबडदरा शिवारात वयोवृद्ध शेतकरी सहादू रामचंद्र खैरनार (वय ७७ वर्षे) हे आपल्या पत्नीसह शेतात राहत होते. रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने त्यांच्या मानेजवळ व पाठीवर वार करून हत्या करण्यात आली. त्याचवेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व सहकारी परिसरात रात्र गस्त करीत होते. ही घटना समजताच त्यांनी रात्री परिसर पिंजून मुख्य आरोपीस पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. नेमका खून कोणत्या कारणास्तव झालेला आहे हे अजून समजू शकले नाही. सदर शेतकऱ्याच्या खुनाने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत तर पोलिसांनी संशयिताचा कसून तपास सुरू केला आहे.