नवी दिल्ली – सोशल मिडियात कधी काय होईल हे सांगता येत नाही. एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे दोन मित्र अडचणीत आले असून त्यांच्या विरुद्ध थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मिडियात पोस्ट टाकताना विशेष काळज घ्यायला हवी, हेच स्पष्ट होत आहे.
दोघां मित्रांविरोधात देशविरोधी घोषणा देण्याचा तसेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधात अयोग्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधीचा व्हीडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत असून विशेष म्हणजे हा व्हिडिओ तीन वर्षापूर्वीचा आहे, असा दावा केला जात आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी अमरोहा पोलीस ठाण्यात दोन मित्रांविरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीसांनी त्यांना अटक करून कोठडीत टाकले आहे. या प्रकरणी पोलीसांनी सांगितले की, सिरसा खुमर गावात राहणाऱ्या दोन मित्रांनी तीन वर्षांपूर्वी एक व्हिडिओ बनवल्याचे सांगण्यात येते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरली गेली होती.
तसेच त्यात एका विशिष्ट संप्रदायाबाबत धार्मिक भावना भडकवण्याशी संबंधित टिप्पणीही त्यांनी केली. त्यानंतर आरोपीने हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला होता. परंतु या प्रकरणामुळे तेव्हा जास्त चर्चा झाली नसल्याने कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. याची पोलिसांना माहिती मिळताच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस तपासात व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांची ओळख पटली असून ते सिरसा खुमार येथील रहिवारी अस्लम आणि वसीम आहे. तसेच तक्रारीवरून दोघांविरोधात देशद्रोहासह अनेक गंभीर कलमांखाली अहवाल दाखल करण्यात आला.