मुंबई – विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर फसवणूक करणारे काही भामटे जुन्या नोटा आणि नाण्यांची विक्री करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या नावाचा वापर करत असल्याचा इशारा आरबीआयने दिला आहे. लोकांकडून आलेल्या तक्रारीनंतर आरबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
रिझर्व्ह बँकेने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. काही असामाजिक तत्व आरबीआयच्या नावाचा वापर करून ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाणे विक्री करण्यासाठी शुल्क किंवा कमिशन मागत आहेत, असे त्यात म्हटले आहे. अशा कोणत्याच व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेचा सहभाग नाही. ट्रॅझॅक्शनसाठी कोणाकडूनही शुल्क किंवा कमिशन घेत नाही. अशा प्रकारचे व्यवहार करण्यासाठी आरबीआयने कोणालाही अधिकार दिलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
फसवणूक करणार्या अशा भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे. यापूर्वीही आरबीआयने अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत लोकांना सतर्क केले आहे. RBI Kehta Hai अभियानांतर्गत लोकांना प्रत्येक आर्थिक फसवणुकीबाबत सावध करत असते.