नवी दिल्ली – खासगी वाहतूक क्षेत्रातील ओला (Ola) कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले होते. या स्कूटरची बुकिंग फक्त ४९९ रुपयांपासून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची रीघच लागली. एका दिवसापूर्वी कंपनीकडून ऑनलाइन विक्री सुरू करण्यात आली. त्यानंतर बुधवारी एका दिवसात कंपनीने ६०० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स विक्री केल्याचा दावा केला आहे.
कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ही घोषणा केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्रतिसेकंद चार स्कूटर्स विक्री करत असल्याचेही ट्विट अग्रवाल यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी प्रतिसेकंद २ स्कूटर विक्री होत असल्याचे म्हटले होते. ओलाने फक्त एका दिवसात विक्री केलेले आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत. ओलाने एका दिवसात जितक्या स्कूटर्स विक्री केल्या, तितक्या स्कूटर्स संपूर्ण औद्योगिक क्षेत्र एका दिवसात विक्री करू शकणार नाही, असा दावाही अग्रवाल यांनी केला आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरचे एकूण दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. तिच्या एंट्री लेव्हल S1 व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आणि S1 Pro व्हेरिएंटची किंमत १,२९,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. या स्कूटर्ससाठी कंपनीकडून आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी कंपनीने वेगवेगळ्या बँकांशी करार केला आहे. S1 व्हेरिएंटचा मासिक हफ्ता (ईएमआय) २,९९९ रुपयांपासून सुरू होईल. तर S1 Pro व्हरिएंटचा मासिक हप्ता ३,१९९ रुपये असतील.
https://twitter.com/bhash/status/1438377168531116033?s=20