विशेष प्रतिनिधी, मुंबई
सर्वसामान्यांसह गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किचनचे बिघडलेले बजेट आता सावरण्याची चिन्हे आहेत. कारण, गगनाला भिडलेल्या खाद्य तेलाच्या किंमती लवकरच घसरणार आहेत. सर्वसामान्यांची होणारी होरपळ लक्षात घेत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भारतात एकूण वापर होणाऱ्या खाद्यतेलापैकी केवळ ३० टक्के तेल आपल्या देशात उत्पादित होते. परंतु सुमारे ७० टक्के तेल हे परदेशातून आयात करावे लागते. अलिकडच्या काळात कोरोना, लॉकडाऊन तसेच पेट्रोल – डिझेलचे दर वाढल्याने मालवाहतूक व्यवस्था महागली. सहाजिकच याचा परिणाम खाद्यतेलाच्या किमती वाढण्यात झाला. परंतु परदेशातून भारतात आयात होणाऱ्या खाद्यतेलाबाबत मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने पाम तेलासह विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रति टन ८ हजार रुपयांची कपात केल्याने गोडतेल (खाद्यतेल) स्वस्त होणार आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रती टनामागे ८६ डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली आहे. तर पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे ११२ डॉलर्सनी घटवण्यात आले आहे. कोरोना काळात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे भाव प्रचंड वाढले होते. खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सर्वसामान्य नागरिकांच्या विशेषतः गृहिणींचे मासिक खर्चाचे बजेट बिघडले होते.
सध्याच्या काळात भारताकडून ७० टक्के खाद्यतेल परदेशातून आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसत होता. मात्र, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव कमी होतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, एकीकडे गोडतेलाचे दर कमी होणार असल्याने समाधान व्यक्त होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधन दरवाढ हा सर्व सामान्य लोकांच्या चिंतेत भर टाकणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. देशातील महागाईने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सहाजिकच गेल्या वर्षभरापासून कोरोना व लॉकडाऊन यामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य लोकांची आर्थिक चिंता आणखी वाढणार आहे.