नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओडिशातील रेल्वे अपघातामागे संभाव्य तोडफोड किंवा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड केल्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. तसेच. याप्रकरणी त्यांनी ड्रायव्हरची चूक किंवा सिस्टीमची चूक स्पष्टपणे नाकारली आहे. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, अपघाताचे मूळ कारण आणि त्याला जबाबदार असणारे दोषी शोधण्यात आले आहेत. बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे हे घडले. याला फेल सेफ सिस्टीम म्हणतात, म्हणजे ते बिघडले तरी सर्व सिग्नल लाल होतील आणि सर्व गाड्या धावणे बंद होतील. सिग्नलिंग सिस्टममध्ये समस्या आहे. असे होऊ शकते की केबल्स न पाहता कोणीतरी खोदकाम केले, असेही ते म्हणाले.
रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा सिन्हा यांनी आज सकाळीच सांगितले की, कोणतेही मशीन चालवताना बिघाड होण्याची शक्यता असते. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एआय-आधारित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमशी अशी छेडछाड केवळ जाणीवपूर्वक केली जाऊ शकते. अधिकाऱ्याने यंत्रणेत कोणताही दोष असल्याचे नाकारले.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चौकशी पूर्ण केली असून अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही मंत्री म्हणाले. हे आतून किंवा बाहेरून छेडछाड किंवा तोडफोडीचे प्रकरण असू शकते, असे ते म्हणाले. आम्ही कोणतीही शक्यता नाकारली नाही. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता बालासोरमधील बहनगा बाजार स्टेशनजवळ अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ११७५ प्रवासी जखमी झाले आहेत.
रविवारी अधिकाऱ्यांनी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरला क्लीन चिट दिली, कारण त्याला पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला होता आणि तो वेगात नव्हता. शुक्रवारी मिळालेल्या प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की कोरोमंडल एक्सप्रेस एका स्टेशनवर लूप लाइनमध्ये घुसली होती जिथे लोहखनिजाने भरलेली मालगाडी उभी होती.
Odisha Train Tragedy Rail Minister CBI Enquiry