नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांची संख्या अपघातानंतर १५ तासांनंतर २८० च्या जवळ पोहोचली आहे, तर जखमींची संख्या ९०० च्या जवळपास आहे. याप्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणी विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडाकडे जाणारी बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीचा शुक्रवारी संध्याकाळी उशिरा भीषण अपघात झाला.
या अपघाताला सिग्नल बिघाड जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी सुरू केला आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले म्हणाले की, सिग्नल बिघाडामुळे एवढा मोठा अपघात होणे विश्वासापलीकडे आणि आश्चर्यकारक आहे. या अपघातामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत ज्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. तिन्ही गाड्या एकमेकांवर कशा पडल्या हे अद्याप समजू शकलेले नाही. सुरुवातीच्या वृत्तानुसार डाउन लाईनवर बेंगळुरू-हावडा ट्रेन ६.५५ वाजता रुळावरुन घसरली आणि अप लाईनवर कोरोमंडल संध्याकाळी ७ वाजता. कोरोमंडलचे रुळावरून घसरलेले डबे आधी बेंगळुरू-हावडा आणि नंतर मालगाडीला धडकले.
अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, यापूर्वी असे अपघात होत असतांना रेल्वेमंत्री राजीनामा देत असत. पवार म्हणाले, ”पण या प्रकरणी कोणीही बोलायला तयार नाही.” ”सरकारचा भर केवळ आलिशान गाड्यांवर आहे. सर्वसामान्यांचे गाड्या आणि ट्रॅक दुर्लक्षित आहेत. ओडिशातील मृत्यू याचाच परिणाम आहे. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.”
Odisha Train Accident Responsibility Opposition Demand