नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओडिशातील भीषण रेल्वे अपघात आणि त्यात २७५ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. अपघातानंतर आता अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट अपघातानंतर काही काळ जागृत होता आणि त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र या भयानक दुर्घटना तथा भीषण अपघातानंतर त्या संदर्भात अनेक कारणे पुढे येत आहेत.
पत्र व्हायरल…
बालासोर सारखाच २०१४ मध्ये गोरखधाम एक्स्प्रेसचा चुरेब आणि २०१८ मध्ये हरचंदपूरमध्ये न्यू फरक्का एक्सप्रेसला अपघात झाला होता. या दोन्ही अपघातांच्या चौकशीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी रेल्वेच्या फुलप्रूफ सिग्नल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता या अपघातावर आणखी एक महत्वाची व धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे.
रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते. मात्र, त्याच्या या पत्राकडे दुर्लक्ष केले गेले. या अधिकाऱ्याचे हे पत्र आता व्हायरल होत आहे. यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत: त्याची दखल घेतली असून या अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे.
पत्रानंतरही…
भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट (इरिटेम) चे महासंचालक हरिशंकर वर्मा हे जवळपास तीन वर्षांपासून दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये तैनात आहेत. हरिशंकर वर्मा जेव्हा तेथे प्रिन्सिपल चीफ ऑपरेशनल मॅनेजर (पीसीओएम) बनले, तेव्हा चुकीच्या मार्गावर ट्रेन जात असल्याची काही प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणी सुरुवातीला स्टेशन मास्तरला जबाबदार धरण्यात आले होते. परंतू, वारंवार असे घडत असल्याचे पाहून वर्मा स्वत: तिकडे पाहणीसाठी गेले होते.
यावेळी ८ फेब्रुवारी रोजी बंगळुरू-नवी दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेस मेन लाइनचा सिग्नल देऊनही चुकीच्या मार्गावर जात होती. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे ही घटना टाळता आली. इंटरलॉकिंगसाठी बनवलेल्या यंत्रणेला बायपास करून लोकेशन बॉक्समध्ये छेडछाड केल्याचे तिथे समोर आले होते. हा प्रकार तातडीने थांबविण्यासाठी रेल्वे बोर्डाला त्यांनी पत्र लिहिले होते. या पत्रानंतरही रेल्वे बोर्डाने काहीच अॅक्शन घेतली नाही आणि कोरोमंडल एक्स्प्रेसोबत मोठी दुर्घटना घडली.
Odisha Railway Accident Officer Letter Viral