नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
ओडिशातील पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात पूर्वापार केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. अगदी मुख्य प्रवेशद्वारावरच या आशयाची पाटी लावण्यात आली आहे. पण, गैरहिंदूंना प्रवेश नाकारण्यावरून दीर्घ काळापासून वादही सुरू आहे. त्यात अलिकडेच ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी जगन्नाथ मंदिरात परदेशी नागरिकांनाही प्रवेश मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जगन्नाथ मंदिर हे चार धामपैकी एक आहे. या ठिकाणी भगवान विष्णूला जगन्नाथ रूपात पूजले जाते. जगन्नाथांसोबतच त्यांचे मोठा भाऊ भगवान बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांची पूजा केली जाते. गैर हिंदूंना गर्भगृहात जाण्याची परवानगी नाही. राज्यपाल गणेशी लाल यांनी या प्रथेवर एकप्रकारे आक्षेपच घेतला आहे. भुवनेश्वरमधील उत्कल विद्यापीठात भाषण करताना म्हणाले की, एखादा परदेशी माणूस जगतगुरू शंकराचार्यांना भेटू शकतो, तर त्याला भगवान जगन्नाथांनाही भेटण्याची परवानगी दिली पाहिजे. लोक माझ्या मताला पसंत करो अथवा नाही, मात्र हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या या सूचनेला विरोधही सुरू झाला आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधींनाही मनाई
१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना गैरहिंदू व्यक्तीशी लग्न केल्याचे कारण सांगत त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास विरोध करण्यात आला होता. यानंतर इंदिरा गांधींना जवळच्या रघुनंदन वाचनालयातून दर्शन घ्यावे लागले होते. नोव्हेंबर २००५ मध्ये थायलंडची राजकुमारी महा चक्री श्रीनिधोर्न ओडिशा दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनाही परदेशी असल्याने बाहेरूनच दर्शन घ्यावं लागले होते. २००६ मध्ये स्विस नागरिक एलिझाबेथ जिग्लर यांनी मंदिरासाठी १ कोटी ७८ लाख रुपयांची देणगी दिली तरीही त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.
प्रचंड वादानंतर निर्णय मागे
२०११ मध्ये तत्कालीन ओडिशा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे तत्कालीन सल्लागार प्यारी मोहन महापात्रा यांनी ओडिशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळावा या मागणीला पाठिंबा दिला आणि वाद निर्माण झाला. यानंतर महापात्रा यांना त्याचं वक्तव्य मागे घ्यावे लागले होते.
Odisha Jagannath Temple Entry Rules