इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशा उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. लग्नाचे वचन देऊन सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हे वचन पूर्ण न केल्यास बलात्कार ठरत नाहीत; असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे भुवनेश्वरमधील एका तरुणावर असलेले बलात्काराचे आरोप रद्द करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, यापुर्वी एका प्रकरणात दोघांच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. लग्नाचे आश्वासन देऊन विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचा दाखला…
सुनावणीवेळी ओडिशा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात असे म्हटले होते, जर एखाद्या व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले; आणि पुढे जाऊन हे लग्न होऊ शकले नाही तर त्याला बलात्कार म्हणता येत नाही. बिघडलेले नाते फसवणूक नाही. एखादे नाते जे चांगल्या आणि प्रामाणिक मैत्रीतून सुरू झाले होते. ते पुढे जाऊन बिघडले तर त्याला नेहमीच फसवणूक म्हणता येत नाही. अशा प्रकरणात कधीही पुरुषावर बलात्काराचा आरोप करू नये, असेही उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत म्हटले आहे. न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांनी याबाबत निर्णय दिला.
फसवणुकीची चौकशी सुरू
बलात्काराचा आरोप रद्द केला असला; तरी तरुणावरील फसवणुकीच्या आरोपाबाबत चौकशी सुरू राहणार आहे. लग्नाचं वचन हे एका विश्वासाने दिले जाते. वचन देऊन काही कारणास्तव ते पूर्ण करू न शकणं आणि सुरुवातीपासूनच लग्नाचं खोटं वचन देणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन दिले असेल, तर त्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र, या प्रकरणात असे झालेले नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले. यावेळी ओडिशा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात असे म्हटले होते, की जर एखाद्या व्यक्तीने लग्नाचे वचन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले; आणि पुढे जाऊन हे लग्न होऊ शकलं नाही तर त्याला बलात्कार म्हणता येत नाही.