इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशात संपूर्ण मंत्रिमंडळाने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता ताजे वृत्त हाती आले आहे की, उद्या म्हणजेच रविवारी दुपारी 12 वाजता नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्व नवीन मंत्र्यांना पदभार सोपवतील, असे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार नवीन पटनायक यांनी सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. ओडिशातील पटनायक यांच्या सरकारने पाचव्या कार्यकाळात तीन वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत आता मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करायचे पटनायक यांनी निश्चित केले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक हे देखील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलामागचे एक कारण आहे. मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पुन्हा जिवंत करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
एकूण 20 मंत्र्यांनी आपले राजीनामे सभापतींकडे सुपूर्द केले आहेत. 2024 मध्ये लोकसभेसोबतच ओडिशामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आता पटनायक आपल्या सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना स्थान देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच, त्यासाठी ते कोणता निकष लावतात याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.