नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-औरंगाबाद रोडवरील ओढा येथे गोदावरी तीरावर पेशवे कालीन असलेल्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. या मंदिर परिसराच्या सुधारणा व मंदिराचे सुशोभीकरणासाठी चार कोटी पंधरा लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सरोज आहिरे यांनी दिली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा करून ओढा ग्रामस्थांची या मंदिराच्या परिसराचा विकास करण्याची मागणी पूर्णत्वास नेली आहे. हे मंदिर पेशवे कालीन पुरातन मंदिर असल्याने नवसाला पावणारा गणपती म्हणुन ख्याती असल्याने प्रत्येक चतुर्थीला भाविकांची प्रचंड गर्दी होते. गोदावरी नदी गावाच्या दक्षिण दिशेकडून वाहत असल्याने तेथे खडकाळ व उंच सखल भागावर हे मंदिर आहे. ओढा गावचे रंगराव जहागीरदार ओढेकर यांनी नाशिकचे काळाराम मंदिर बांधल्याने व त्यांचा पुरातन वाडाही येथे असल्याने या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. गणपतीच्या दर्शनाला थेट चांदोरी, सायखेडा, निफाड, चाटोरी, भेंडाळी परिसरातील गावांतून भाविक तरूण व महिला वर्ग पायी चालत येतो. अंगारकी चतुर्थीला येथे भव्य यात्रेचे स्वरूप निर्माण होते. भाविक रांग लावून दर्शन घेतात. या सुधारणांमुळे भाविकांची उत्तम व्यवस्था होईल आणि एक उत्तम तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ या निधीतून विकसीत होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.