आज आपण पाहतो जगात सर्वात स्थौल्य किंवा लठ्ठपणा या आजाराने फारच गंभीर स्वरूप धारण केले आहे. स्थौल्यामध्ये भारताचा क्रमांक तिसरा असून आजची बदलती जीवनशैली हे यामागचं प्रमुख कारण आहे. लठ्ठपणाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. हे प्रमाण जर असेच वाढत गेले तर त्याचा दुष्परिणाम नक्कीच आपल्या पुढच्या पिढ्यांवर व त्यांच्या आरोग्यावर होतील. आयुर्वेद शास्त्रामध्ये अष्टौनिंदीत व्यक्ती वर्णन केल्या आहेत. त्यात एक स्थुलता आहे. आयुर्वेदानुसार स्थौल्य कसे निर्माण होते ते आधी समजून घेऊया…
चुकीचा किंवा अपथ्यकर आहार सेवन केल्याने तसेच चुकीच्या दिनचर्येचे पालन केल्याने शरीरात मेद धातूचा अग्नी क्षीण(कमी) होतो. त्यामुळे शरीरात निर्माण होणार्या चरबीचे चयापचय नीट होत नाही व अतिरिक्त चरबी निर्माण होते. हीच चरबी शरीरातील सूक्ष्म स्रोतांमध्ये अवरोध निर्माण करते. त्यामुळे वात हा कोष्ठामध्ये प्रवेश करून पोटात आगीचा वणवा पेटवतो. पर्यायाने भूक भरपूर लागते व खाल्लेले अन्न देखील पचते. अती खाण्याने मेद धातूचे पोषण मात्र योग्य होत नाही. त्यातून पुन्हा अतिरिक्त मेद तयार होतो. या विष चक्रात ती व्यक्ती अडकते. अशावेळी सर्व शरीर धातुंचे पोषण योग्य प्रमाणात होईल अशा पद्धतीचा आहार, विहार व औषधांची योजना करावी लागते. अन्यथा खुप अधिक प्रोटीन्स खाऊन अजीर्ण किंवा आमदोष होतो. किंवा फॅट कमी करण्याच्या नादात डायटिंग करुन सांधे खुळखुळे होतात.
स्थौल्याची कारणे
भुकेपेक्षा अधिक प्रमाणात आहार सेवन केल्याने, पूर्वी खाल्लेले अन्न पूर्ण पचायच्या आत किंवा भूक नसताना जेवण करणे यासारख्या कारणांनी तिन्ही दोषांचा विशेषतः कफ दोषाचा प्रकोप होऊन पचनाचे विविध आजार उत्पन्न होतात व मेद वृध्दी होते.
केवळ जास्त प्रमाणात अन्न खाल्यानेच नव्हे तर न आवडणारे अन्न वांरवांर खाणे ,खूप थंड, शिळे, नासलेले अन्न खाणे, विरुद्धान्न ,असात्म्य (सवयीचे नसलेले), प्रकृतीच्या विरुद्ध ,ऋतूला अनुकूल नसलेले अन्नसेवन यामुळे देखील पचनावर परिणाम होवुन स्थौल्य किंवा इतर विकार उत्पन्न होतात.
पचायला जड अन्नपदार्थ, डालडा, मिठाई, अति प्रमाणात मीठ, तेल, , साखर, मांसाहार, थंडपेये, मद्यपान, फरसाण, फाँईड फुड, बेकरी पदार्थ खाणे.
जेवताना चिंता, शोक, क्रोध, भीती आदि भाव मनात नसावे कारण मानसिक भावांचा अन्नाच्या परिणमनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो.
मल, मुत्रप्रवृत्तीचे नैसर्गिक वेग अडवणे यामुळे शरीरातील मल, विषारे यांचा निचरा नीट होत नाही.
तुलनेने काम वा हालचाल कमी होणे, व्यायामाचा अभाव यामुळेही स्थौल्य येते.
एकाच जागी जास्त वेळ बसणे, बैठे काम यामुळे पोट, कमर, मांड्या इ. भागात स्थौल्य किंवा सेंट्रल ओबेसिटी येते.
दुपारी झोपणे, जेवणानंतर लगेच झोपणे असा कारणांनी सुध्दा शरीरात आमदोष तयार होतो.
हॉमोन्समधील बदलामुळे स्त्रिया वयाच्या चाळिशीनंतर जाडजूड होतांना दिसतात त्याचबरोबर हायपोथॉयराईड, पी.सी.ओ.डी यासारख्या आजारांमध्येही वजन वाढतांना दिसते.
चिकीत्सा
आहारातील बदल
आहारातील वर उल्लेखलेली सर्व कारणे टाळावीत. सहजपणे पचवता येईल इतकाच आहार घ्यावा त्यासाठी भुकेचे चार भाग करून तीन भाग भरतील व चवथा भाग वातसंचारासाठी रिकामा राहील एवढेच अन्न सेवन करावे. असा मिताहार अग्नि(पचनशक्ती) प्रदीप्त करतो. पचायला जड अन्नपदार्थ, मिठाई, मांसाहार इ. तर पोट अर्धे भरेल एवढेच खावे.
रोजच्या आहारात सहा चवींचा (गोड़,तिखट,कडू,खारट,आंबट,तुरट)समावेश असावा . फक्त एकाच चवीचे अन्न अधिक खाल्याने शरीराचे पुरेसे पोषण होत नाही.
दोन जेवणात ७/८ तासांचे अंतर ठेवावे . जेवणाच्या दोन वेळा नियमित ठेवाव्या .
सर्व धान्ये शक्यतो 1 वर्ष जुनी वापरावी किंवा भाजुन वापरावी. भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा. अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही
विहार – व्यायाम इ. –
भोजनानंतर लगेच शारीरिक कष्ट जसे व्यायाम, पळणे, झोपणे ,उन्हात जाणे, स्नान करणे या गोष्टी टाळाव्यात अन्यथा पोटाकडील रक्ताभिसरण इतर शरीराकडे वाढुन पचनक्रिया मंदावते
जेवणानंतर शतपावली करावी
रोज कमीत कमी 45 मिनीटे व्यायाम, सुर्यनमस्कार, योगासने, (बसून,उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) पोट चेपले जाईल असे व्यायाम, मैदानी खेळ, चंक्रमण(चालणे), बागकाम इ. करावे.
चालणे, धावणे, नृत्य, पोहणे, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे.
बैठे काम करत असल्यास दर अर्धा तासाने उठून थोडे फिरावे, stretching करावे. सतत एका जागी बसणे टाळावे.
रोज आंघोळी साठी साबणऐवजी मेद कमी करणा-या औषधांचे (मुस्ता, गुडुची, त्रिफला, विडंग, सुंठ, यवाचे पीठ इ.)उटणे वापरावे.
दिवसा झोपु नये.
कार, लिफ्ट, सोफा, कमोड यांचा वापर कमीत कमी करावा .
नेहमी खाली बसणे, जिने चढणे, पायी चालणे, हाताने जास्त कामे करणे यावर भर द्यावा ज्यायोगे रक्ताभिसरण चांगले होते व काही महिन्यानंतर शरीर कृश होवु लागते
पंचकर्मव औषधोपचार –
वमन , विरेचन , लेखन बस्ती , नस्य, उद्वर्तन, अभ्यंग, स्वेदन यासारख्या पंचकर्मातील शुद्धीक्रियांनी तर स्थौल्य लवकर आटोक्यात येते . आपल्या प्रकृतीनुरुप, स्थौल्याचे कारण काय आहे त्यानुसार पंचकर्म व औषधे यांची योजना तज्ञ वैद्याकडुन करावी.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!