नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात ओबीसी आरक्षणासाठी आडनावावरुन माहिती गोळा केला जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यात तथ्य असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील समता परिषदेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी समर्पित आयोगाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या ओबीसी आयोगाच्या वतीने शासकीय कार्यालयातून डेटा गोळा करण्यात येत आहे मात्र काही कार्यालयातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ आडनावावरून ओबीसींचा डेटा गोळा करण्यात येत आहे. आडनावावरून ओबीसींचा डेटा गोळा केला तर ओबीसींची खरी आकडेवारी समोर येऊ शकणार नाही. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा याला विरोध असून उद्या (दि.१५ जून) महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत स्थरावर निदर्शने करणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी व शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांनी दिली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ओबीसींचा डेटा हा गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील तसेच शहर पातळीवर नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक्ष यंत्रणेकडून डेटा गोळा करणे अपेक्षित आहे. मात्र काही यंत्रणेकडून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ आडनावाच्या माध्यमातून डेटा गोळा केला जात आहे. यामुळे ओबीसींचा परिपुर्ण डेटा गोळा होणार नाही.हा ओबीसींवर होणार मोठा अन्याय आहे. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने उद्या दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर सायंकाळी ४ वाजता महानगरपालिका, तालुका पातळीवर पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका व ग्रामपालिका, ग्रामपंचायत स्थरावर निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
			







