येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्यातील बुंदेलपुरा भागात स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी छापे टाकून दोघा संशयित आरोपींकडून नायलॉन मांजा जप्त केला. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस शिपाई संदीप लगड यांनी ही कारवाई केली.
मकर संक्रांत आली की पतंग उत्सव येवल्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्साहात अनेक ठिकाणी अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री होत असते. या मांजामुळे गळा कापून मृत्यू झाल्याच्या किंवा गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुप्त बतमीव्दारे मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैधरित्या होत असलेल्या नायलॉन मांजा विक्री विरोधात अगोदराच धडक मोहीम केली आहे. त्यात ही येवल्याची कारवाई करण्यात आल्यामुळे या नायलॅान मांजा विक्रीला चाप बसणार आहे. या गुन्ह्याचा तपास येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गांगुर्डे व पोलीस नाईक पगार हे करत आहेत