मालेगाव – तालुक्यातील सजा वनपट येथील तलाठी अनंता अशोक वायाळ याला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका शेतकऱ्याला कॅनरा बँकेकडून कर्ज मंजूर झाले. या पीक कर्जाच्या बोजाची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी वायाळ याने शेतकऱ्याकडे ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) याची तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. तालुक्यातील दहिदी येथील तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी वायाळ याने सात हजार रुपयांची रक्कम स्विकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने वायाळ याला रंगेहाथ पकडले. वायाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीचे पथक पुढील तपास करीत आहे. लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.